मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधीची उधळण करण्यात आली आहे. या मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानावरील खर्चाबाबत माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी याबाबत टि्वट केलं आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे. त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे. मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले आहेत. मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही."
काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे.त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे.मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 14, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधीची उधळण करण्यात आली आहे. या मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरूस्तीबाबत मी माहिती घेतली आहे. या बंगल्यावर 90 कोटी रूपये खर्च झालेले नाही. या खर्चाचा आकडा अजून आलेला नाही, तर 90 कोटी खर्च झाल्याचा आकडा कोठून आला."
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली आहे. अधिवेशनाला जाण्यापूर्वी अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत अजित पवार म्हणाले की मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आधीपेक्षा जास्त वकील सुनावणीसाठी दिले आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू आहे. त्याची तारीख पुढे ढकलली आहे, याबाबत सर्वांना माहिती आहे. तारखेच्या वेळी चांगले वकील देण्याचं काम सरकार करीत आहे.
"गेल्या वर्षभरात सरकारने काय काम केले, हे विरोधकांनी पाहिलंच नाही. हे सरकार कधी पडतंय आणि पडणार याचा मुहूर्त शोधण्यातच त्यांचं वर्ष गेलंय,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना काल फटकारले होते.
कालच्या पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, जनतेमध्ये सरकारबाबत नाराजी, असमाधान आहे, असे कुठेही दिसत नाही. विरोधी पक्ष या नावातच विरोध आहे, ते त्या गोष्टीला जागले आहेत. अधिवेशनाबाबत त्यांनी सांगितले की, "अधिवेशनात सहा अध्यादेश पटलावर ठेवली जातील. शोकप्रस्ताव, विधेयक, अर्थसंकल्प असेल. तर पुरवण्या मागण्या, विधेयकांवर चर्चा होणार आहे.'

