लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा; अधिकाऱ्यांनी सरकारकडे व्यक्त केली अपेक्षा - Maharashtra Officers worried about Relaxation in Fourth Phase of Corona Lock Down | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा; अधिकाऱ्यांनी सरकारकडे व्यक्त केली अपेक्षा

तात्या लांडगे
रविवार, 17 मे 2020

पावसाळा तोंडावर असून राज्यातील मागील काही दिवसांपासून रुग्णांचा वाढणारा आलेख चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा, असे म्हणणे रेड झोनमधील जिल्हा व महापालिका प्रशासनाने सरकारला कळविले आहे

सोलापूर  : पहिल्या लॉकडाउनवेळी (२२ मार्च रोजी) संपूर्ण राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ होती. आता चौथ्या लॉकडाउनपूर्वी राज्यातील रुग्णसंख्या २९ हजारांहून अधिक झाली असून मागील १४ दिवसांत तब्बल १७ हजार ५९४रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, आता पावसाळा तोंडावर असून राज्यातील मागील काही दिवसांपासून रुग्णांचा वाढणारा आलेख चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा, असे म्हणणे रेड झोनमधील जिल्हा व महापालिका प्रशासनाने सरकारला कळविले आहे.

१ मे रोजी वर्धा, गडचिरोली हे दोन जिल्हे ग्रीन झोनमध्ये तर भंडारा, गोंदिया, वाशीम, चंद्रपूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार व कोल्हापूर हे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये होते. तर चंद्रपूर, नांदेड ग्रामीण व लातूर महापालिकेचा परिसर ग्रीन झोनमध्ये होता. तसेच नागपूर, अमरावती, अकोला, औरंगाबाद, धुळे, नाशिक या जिल्ह्यांतील ग्रामीण भाग ऑरेंज झोनमध्ये तर जळगाव, उल्हासनगर महापालिकेचा परिसरही ऑरेंज झोनमध्ये होता. 

१५ मे पर्यंत परिस्थिती बदलली

मात्र, १५ मे पर्यंत परिस्थिती खूपच बदलली असून आता फक्त राज्यातील सिंधुदुर्ग, परभणी, उस्मानाबाद, बीड, वर्धा, भंडारा, गोंदिया, वाशीम व चंद्रपूर हे नऊ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर गडचिरोली हा एकमेव जिल्हा ग्रीन झोनमध्ये राहिला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले, तरीही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन शिथिल करताना परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा सोलापूर, पुणे, मुंबईसह अन्य काही जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक बाबी....

- आतापर्यंत राज्यातील दोन लाख ५० हजार ४३६ व्यक्तींच्या कोरोना टेस्ट; त्यासाठी तब्बल ११३ कोटींचा झाला खर्च

- कोरोनाचे रुग्ण सापडल्याने राज्यातील एक हजार ४७३ परिसर प्रतिबंधित (कंटेन्मेंट); जिल्हा व महापालिका प्रशासनाने दिली राज्य सरकारला सद्यःस्थितीची माहिती

- राज्यात मागील १५ दिवसांत वाढले तब्बल १७ हजार ५९४ रुग्ण; दररोज सरासरी तेराशे रुग्णांची भर; सोलापूर, पुणे, मुंबईसह अन्य महापालिका परिसरातील रुग्णवाढीचा वाढला वेग

- राज्यातील नऊ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर गडचिरोली हा एकमेव जिल्हा आहे ग्रीन झोनमध्ये; एक हजार ६८ व्यक्तींचा आतापर्यंत कोरोनामुळे झाला मृत्यू; आतपर्यंत बरे झाले सहा हजार ५६४ रुग्ण

- मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, कल्याण-डोंबिवली, पुणे, सोलापूरसह औरंगाबाद, अकोला व नागपूर महापालिका परिसरात रुग्ण वाढीचा वेग अधिक; मीरा-भाईंदर, वसई-विरार, अमरावती, पनवेल, पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात तर सातारा, रायगड, नाशिक, पुणे, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांतील वाढत्या रुग्णांकडेही लक्ष देण्याची गरज

- प्रतिबंधित क्षेत्रातून अन्य परिसरात जाण्यास तेथील नागरिकांना बंदी असतानाही अनेकजण करीत आहेत नियमांचे उल्लंघन; राज्यातील तब्बल 10 हजारांहून अधिक व्यक्तींविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाले आहेत गुन्हे

- राज्यात तब्बल तीन लाख 29 हजार 302 व्यक्ती आहेत होम क्वारंटाइन; 16 हजार 306 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन; दररोज सरासरी साडेसहा हजार संशयित व्यक्तींची दररोज होतेय कोरोना टेस्ट

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख