शाळा सुरु करण्याचा वादंग काँग्रेसच्या अंगलट येणार? - Decission about Schools may become boomrang on Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

शाळा सुरु करण्याचा वादंग काँग्रेसच्या अंगलट येणार?

महेंद्र महाजन 
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

एकीकडे कोरोनाच्या आपत्ती काळातील वीज बिलातून सामान्यांना दिलासा देणे शक्य होईना म्हटल्यावर काँग्रेसने सारवा सारवीची भूमिका घेतली. आता शाळेत मुलांना पाठवण्याची बाब पालकांवर सोडून देत ठोस धोरण स्विकारले न गेल्याने वादंगाला तोंड फुटलयं. हा वादंग काँग्रेसच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागलीत

नाशिक : राज्य सरकार गोंधळले आहे अशी सपाटून टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी करत सत्ताधाऱ्यांच्या नादात दम आणलाय. त्याचवेळी एकीकडे कोरोनाच्या आपत्ती काळातील वीज बिलातून सामान्यांना दिलासा देणे शक्य होईना म्हटल्यावर काँग्रेसने सारवा सारवीची भूमिका घेतली. आता शाळेत मुलांना पाठवण्याची बाब पालकांवर सोडून देत ठोस धोरण स्विकारले न गेल्याने वादंगाला तोंड फुटलयं. हा वादंग काँग्रेसच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागलीत. त्यामागील कारण म्हणजे, शालेय शिक्षण आणि आदिवासी विकास हे दोन विभाग काँग्रेसकडे आहेत.

मुंबई, ठाणेमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत, तर औरंगाबाद शहरात ३ जानेवारी २०२१ पर्यंत शाळा उघडणार नाहीत, असे धोरण स्विकारले गेले. मग मात्र शिक्षकांप्रमाणेच पालकांचा संयम सुटला असून आमच्यावर शिरजोर का? अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुळातच, कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने राज्यातील आरोग्य विभागाने तयारीला सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्गाला कारणीभूत ठरणारी व्यवस्था सुरु ठेवायची काय? याबद्दल सरकारने ठाम भूमिका घ्यायला नको काय? असे प्रश्‍न पालक उपस्थित करु लागलेत.

ही सारी स्थिती पुढे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा श्री. दरेकर यांनी टीकास्त्र सोडले. राज्यात सगळीकडे शिक्षक-शिक्षकेत्तरांना चाचणी करुन घेण्यासाठी रांगा लावल्यात. त्यातून ‘पॉझिटिव्ह' शिक्षकांची संख्या पुढे यायला लागली. आता चाचणी ‘निगेटिव्ह' आली आणि कोरोनाच्या संसर्गाची ठिणगी पडल्यावर शाळांच्या व्यवस्थापनावर खापर फोडून नामानिराळे होणार आहेत काय? अशी भावना शिक्षकांमध्ये तयार झाली आहे.

शिक्षणमंत्र्यांना तयारीचा अधिकाऱ्यांकडून विश्‍वास
राज्यातील शाळा १ नोव्हेंबरपासून सुरु करण्यासंबंधीच्या हालचाली यापूर्वी सुरु झाल्या होत्या. पण दिवाळीनंतरची स्थिती पाहून निर्णय घेणे शक्य होईल, अशी सूचना राज्यातील काही अधिकाऱयांनी केली होती. पण ती धुडाकावून लावत २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे धोरण शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्विकारले. शाळा सुरु होताहेत म्हटल्यावर अगोदर एकलव्य निवासी शाळा सुरु करण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रशासनाने आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी यांच्या माध्यमातून सरकारी-अनुदानित आश्रमशाळा-एकलव्य आणि वसतिगृह १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता पालक, शिक्षकांप्रमाणे संस्था चालकांच्या तयार होणाऱया रोषाला शिक्षणमंत्री आणि आदिवासी विकासमंत्री या दोघांना पुढे केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

काँग्रेसची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी मिळत नाही असा नाराजीचा सूर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आळवला. त्यानंतर वीजबिलातून सवलतीसाठी निधी मिळत नसल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नाराजीची चर्चा राज्यभर झाली. काँग्रेसच्या विभागांवर निधीवरुन अन्याय होत असल्याचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमध्ये स्पष्ट केले. ही सारी परिस्थिती एकीकडे असताना काँग्रेसने ‘ताक सुद्धा फुंकून प्यायला‘ हवे ना? अशी भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. आज शालेय शिक्षणमंत्र्यांनी आॅनलाइन शिक्षणाधिकारी, उपसंचालक आणि इतर अधिकाऱयांची बैठक घेतली. त्यानंतर उच्चपदस्थ अधिकाऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ७० टक्के अधिकाऱयांनी शाळा सुरु करण्याची तयारी झाल्याचा विश्‍वास दिलायं. खरे म्हणजे, पालकांच्या-शिक्षकांच्या वास्तववादी प्रतिक्रिया मंत्र्यांपर्यंत, शिक्षण आयुक्त, सचिवांपर्यंत का पोचवत नाहीत? याचे कोडे पालकांना उलगडत नाही.

वैद्यकीयदृष्ट्या लाखमोलाचा सल्ला
दिवाळीनंतर ज्येष्ठांचे कोरोनाग्रस्तांमधील आणि मृत्यूंमधील प्रमाण वाढत चालले आहे. एवढेच नव्हे, तर दिवाळीनंतर चाचण्या वाढल्या, तशी रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. अशा परिस्थितीत शाळांच्या माध्यमातून ‘असिमट्यामॅटीक' (लक्षणे नसलेली) रुग्णसंख्या आणि पर्यायाने घरांमधील रुग्णांची संख्या वाढणार नाही ना? या प्रश्‍नाने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात रुंजण घातले आहे. त्यामुळे शाळा सुरु करत असताना वैद्यकीयदृष्ट्या सल्ला लाखमोलाचा ठरणार आहे. भंडारा आणि पालघरमध्ये शिक्षक-शिक्षकेत्तर चाचण्यांचा वेग मंद आहे. त्यावर इलाज काय तर म्हणे, चाचण्यांचा वेग वाढवा. पण त्याचवेळी पालकांची संमती महत्वाची असे शालेय शिक्षणमंत्री अधोरेखित करत असले, तरीही सरकारचा आदेश आहे म्हटल्यावर शाळा सुरु झाल्या नाहीत असे होऊ नये म्हणून यंत्रणेची लगीनघाई चालली आहे. 

आता हेच पाहा ना, औरंगाबाद शहरातील शाळा सुरु होणार नाहीत म्हटल्यावर ग्रामीण भागातून शाळा सुरु करण्याच्या अट्टाहासाच्या विरोधात सोशल मीडियातून प्रतिक्रियांचा भडीमार सुरु झाला आहे. त्याचवेळी सॅनिटायझेशन आणि दक्षतेसाठीच्या दिवसाच्या पाच ते दहा हजार रुपयांच्या अतिरिक्त खर्चाच्या भुर्दंडबद्दल संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापकांनी उघडपणे मत नोंदवले नसले, तरीही या खर्चाचा मुद्दा राज्यात कळीचा मुद्दा होणार आहे. एकीकडे सरकार पंधराव्या वित्त आयोगातून खर्च करा म्हणत आहे, ही बाब काही संस्थाचालकांनी पुढे करण्यास सुरवात केली आहे. त्याचवेळी शिक्षण विभागाचे अधिकारी ‘नॉन सॅलरी ग्रँट' हा वेतनावरील पाच टक्के अनुदानातून खर्च होऊ शकेल, असे सांगताहेत. प्रत्यक्षात पाच टक्के खर्च कसा करायचा याचे नियम सरकारने घालून दिले आहेत आणि १९९७ नंतरच्या अनुदान मिळणाऱया शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना हे अनुदान मिळत नाही, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाला हे अनुदान मिळत नाही अशी वस्तुस्थिती शिक्षकांशी संवाद साधल्यावर पुढे आली.

सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेसाठीचा खर्च
० ५ लिटर आल्कोहोल बेस सॅनिटायझेशन ः ३६२ रुपये
० ५ लिटर जेलबेस सॅनिटायझेशन ः ४८८ रुपये
० ५ लिटर सोडिअम हायपोक्लोराईड ः ११५ रुपये
० ५ लिटर हँडवॉश ः २८३ रुपये
० इन्फ्रारेड थर्मामीटर ः अकराशे ते साडेअकराशे रुपये
० आॅक्सीमीटर ः साडेअकराशे रुपये
(राज्यातील एकुण खर्चाचा ताळेबंद यावरुन होतो स्पष्ट)
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख