धक्कादायक : बीडच्या तलाठ्यांना 'एसडीओं'कडूनच पैसे खाण्याची शिकवणी? - Ambajogai SDO Teaching Talathi's how to take bribe | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : बीडच्या तलाठ्यांना 'एसडीओं'कडूनच पैसे खाण्याची शिकवणी?

दत्ता देशमुख
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अंबाजोगाईत १८ फेब्रुवारीला झालेल्या तलाठ्यांच्या बैठकीत  शोभादेवी जाधव यांनी आर्थिक देवाण - घेवाणीबद्दल थेट  वक्तव्य केल्याचा केंद्रे यांचा दावा आहे. त्यांनी याचीही ऑडिओ क्लिपसादर केली आहे. या तारखेला त्यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा उपस्थिती अहवालही या  तक्रारीसोबत जोडला आहे. सीडीतील संभाषणात शोभादेवी  जाधव कोणत्या मिनीटाला काय बोलल्या याचा गोषवाराही  तक्रारीत देण्यात आला असून हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते आहे.

बीड  : महसूल खात्यामधील भ्रष्टाचार हा नवा विषय नाही. मात्र,  तलाठ्यांनी भ्रष्टाचार केला तर तहसिलदार किंवा उपविभागीय  अधिकाऱ्यांकडून न्याय मिळेल, असा साधारण समज आहे.  मात्र, खुद्द उपविभागीय अधिकारीच तलाठ्यांना 'कोणत्या  प्रकरणात किती पैसे खायचे' याची शिकवण देत असल्याचा  गंभीर प्रकार उघडकीला आला आहे

सचीन केंद्रे या निलंबीत तलाठ्यानेच हा अंबाजोगाईच्या  उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव यांच्याबाबत ही माहिती उघड केल आहे. अगदी बैठकीत त्या तलाठ्यांना पैसे खाण्याची शिकवण  देत असल्याची अर्धा तासाच्या ऑडिओ क्लिपसह  अधिकाऱ्यांच्या डिशचे रिचार्ज केल्याच्या पावत्याही गुरुवारी  (ता. ३०) विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रे यांनी केलेल्या तक्रारीत जोडण्यात आल्या आहेत. 

अंबाजोगाईत १८ फेब्रुवारीला झालेल्या तलाठ्यांच्या बैठकीत  शोभादेवी जाधव यांनी आर्थिक देवाण - घेवाणीबद्दल थेट  वक्तव्य केल्याचा केंद्रे यांचा दावा आहे. त्यांनी याचीही ऑडिओ क्लिपसादर केली आहे. या तारखेला त्यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा उपस्थिती अहवालही या  तक्रारीसोबत जोडला आहे. सीडीतील संभाषणात शोभादेवी  जाधव कोणत्या मिनीटाला काय बोलल्या याचा गोषवाराही  तक्रारीत देण्यात आला असून हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते आहे. 

महिन्याला २५ हजार अन॒ बरेच काही

अंबाजोगाई सज्जाच्या अतिरिक्त पदभारासाठी ५० हजार रुपये, तसेच महिन्याला २५ हजार रुपये व मे महिन्यात या सज्जावर बदलीसाठी एक लाख रुपये मागीतल्याचे सचिन केंद्रे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. महिन्याला २५ हजारांसह त्यांच्या वाहनात इंधन टाकणे, शासकीय व खासगी वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च करायला लावणे, स्वत:च्या घरात आरओ फिल्टर बसवून घेणे आणि घरातील कार्यक्रमांचा खर्च करायला लावणे, पुर्वी २५ हजार महिन्यांवरुन ५० हजारांची मागणी, असे आरोपही शोभादेवी जाधव यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीत केंद्रे यांनी केले आहेत. आपल्या 'फोन-पे'वरुन जाधव यांच्या डिश टिव्हीचे रिचार्ज केल्याचा पुरावाही केंद्रे यांनी सोबत तोडला आहे.

२० लाख द्यायला तयार; कोणत्या प्रकरणात किती पैसे खायचे

सचिन केंद्रे यांनी जाधव यांनी घेतलेल्या बैठकीतील ऑडिओ क्लिपही तक्रारीसोबत सादर केली आहे. तक्रारीत ऑडिओ क्लिपमधील प्रत्येक मिनिटाचे संभाषण नमुद करण्यात आले असून ते शोभादेवी जाधव यांचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ''नाना लाडच जे झालं ते तुमच्याबरोबर करायची माझी चुकून इच्छा नाही. आम्ही लाडची प्रतिनियुक्ती, निलंबन आणि सगळंच केलं. लाड २० लाख रुपये द्यायला तयार होता. त्रास दिल्यावरच तुम्ही फक्त एसडीओची किंमत करणार आणि एसडीओला विचारणार का? कोणत्या प्रकरणाला किती पैसे खायचे याची पद्धत समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. इथल्या पाॅलिटिशिअन्स सोबत मला रिलेशन खराब करुन घ्यायचे नाहीत. पण, जर मला त्रास दिला, तुमच्यामुळे माझे रिलेशन खराब झाले तर मी तुमचं काहीतरी कारुन टाकीन. खोटेला सांगून किंवा कोणालातरी सांगून किती आणून देता. २० किंवा २५ हजार रुपये. पण, तुम्ही कधी प्रत्यक्ष भेटता का. मी आजुन ठरवलं नाही. पण, ठरवलं तर तुम्हाला त्रास होईल....'' अशा प्रकारचे वक्तव्य शोभादेवी जाधव यांचे असल्याचे केंद्रे यांनी निवेदनात म्हटले आहे. जाधव यांनी आपली आतापर्यंत तीन लाख रुपयांची पिळवणूक केल्याचाही आरोप केंद्रे यांनी केला आहे. (यातील लाड हे निलंबीत तलाठी तर लिपीक व कोदरकर तलाठी आहे)

तक्रारीबाबत शोभादेवी जाधव यांना विचारले असता, ''काय अर्ज दिला आहे ते आपणाला माहित नसून याबाबत विचारणा झाल्यानंतर आपण उत्तर देऊ. आपल्याला कथित आॅडिओ क्लिपबाबत काहीही माहिती नाही," असे उत्तर त्यांनी दिले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख