अजित पवार म्हणतात, त्याच्या तीन पिढ्या आमच्यासोबत असल्या तरी गय करणार नाही  - Will not spare a person violating the law : Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवार म्हणतात, त्याच्या तीन पिढ्या आमच्यासोबत असल्या तरी गय करणार नाही 

मिलिंद संगई 
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

गुंडगिरी, दादागिरी मी सहन करणार नाही.

बारामती : "बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहायला हवी, सुरक्षेचे वातावरण कायम असायला हवे, शहरात गुंडगिरी दादागिरी मी सहन करणार नाही,'' अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

बारामतीतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, हायटेक टेक्‍स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्यासह नगरसेवक या प्रसंगी उपस्थित होते. 

सावकारीच्या मुद्यावर बोलताना अजित पवार यांनी "आपण सगळे मिळून सावकारांची वाट लावून टाकू,' अशा रोखठोक भाषेत आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, "बारामतीत माझी भगिनी सुरक्षितच राहायला हवी, त्या बाबत कसलीच तडजोड मी मान्य करणार नाही. कोणीही कायद्याचं उल्लंघन करीत असेल आणि त्याच्या तीन पिढ्या आमच्यासोबत काम करणाऱ्या असल्या तरी त्याची गय करणार नाही.'' 

बेकायदा शस्त्रांबाबत मी मध्यंतरी वाचले. बारामतीत वाळूमाफिया असो किंवा अवैध शस्त्रे बाळगणारे असोत अशा लोकांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्याच्या पोलिसांना मी सूचना दिल्या आहेत, असेही पवार यांनी या वेळी नमूद केले. 

बारामती-मोरगाव चारपदरी होणार 

बारामती ते मोरगाव हा रस्ता सध्या तीन पदरी करण्याचे काम सुरु आहे. पण, भविष्यात हा रस्ता चार पदरी करण्याचे आपले नियोजन आहे. बारामतीत महिलांसाठी स्वतंत्र स्वीमींग पूल उभारणार असून माळावरच्या देवीच्या देवळानजिक तो असेल, कचरा डेपो हलवून कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचे खत तयार केले जाणारा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. 

बारामतीत 7 मीटरचे 2480, तर 9 मीटरचे 1007 असे 3487 पोल बसवले जाणार आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी प्रास्ताविक केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख