गावकारभाऱ्यांचे आरक्षण नव्याने जाहीर होणार; सोडती 27 जानेवारीपासून 

त्यानुसार 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व 14 हजार ग्रामपंचायतींचे सरपंच कार्यभार स्वीकारतील.
Reservation of Sarpanch post will be announced anew; Leaving reservation starting January 27th
Reservation of Sarpanch post will be announced anew; Leaving reservation starting January 27th

शिक्रापूर (जि. पुणे) : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसह पुणे जिल्ह्यातील 749 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत नव्याने काढली जाणार आहे. विविध जिल्ह्यांत वेगवेगळ्या तारखेनुसार या सोडती काढल्या जाणार आहेत. पूर्वी काढण्यात आलेल्या सर्व आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्रालयातून देण्यात आली. आरक्षण सोडत आणि सरपंचांना कार्यभार स्वीकारण्याचे वेळापत्रकही देण्यात आले आहे. त्यानुसार 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व 14 हजार ग्रामपंचायतींचे सरपंच कार्यभार स्वीकारतील. 

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीचा 34 जिल्ह्यांत धुरळा उडाला आणि 18 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर मात्र सरपंचपदाची उत्सुकता गावागावांत शिगेला पोचली आहे. दरम्यान, अनेक जिल्ह्यांत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. पण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिसूचना काढून अगोदरचे आरक्षण रद्द करून निवडणुकीनंतर सोडत काढण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे निवडणुकीतील चुरस काहीशी कमी झाली होती. पण, आता निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड होणार असल्याने आरक्षणाची सोडत नव्याने होणार की पूर्वीचेच आरक्षण कायम राहणार, याबाबत उलटसुलट चर्चा होती. 

या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाशी संपर्क साधला असता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंत्र्यांच्या आदेशाचा हवाला देत सांगितले की, सरपंच आरक्षणाच्या पूर्वीच्या सोडती रद्द केल्या आहेत, त्याबाबतचा अध्यादेशही प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे पूर्वीची संपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. 

आता प्रत्येक जिल्ह्यात सरपंच आरक्षण व निवड कार्यक्रम कळविलेला आहे. त्यानुसार बुधवारपासून (ता. 27 जानेवारी) वेगवेगळ्या जिल्ह्यांत आरक्षणाची सोडत जाहीर केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील सरपंच आरक्षण सोडत ता. 28 जानेवारी रोजी होणार आहे. पुढील 30 दिवसांत सोडतीप्रमाणे सरपंच निवड करून प्रशासकांनी पदभार नव्या सरपंचांकडे सुपूर्त करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण नव्याने होणार आणि नव्या आरक्षणानुसारच सरपंच निवडी होणार असल्याचे ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com