रेशन दुकानदारांकडून अडवणूक ; हातावर पोट असलेल्यांचे होताहेत हाल

धान्य पाहिजे तर जादा पैसे मोजावे लागतील, असे रेशन दुकानदार सांगतो, ही परिस्थिती आहे, पुण्यातील.
ration_cards
ration_cards

पुणे : तीन-चार दिवसांपूर्वी महापालिकेकडून धान्याचे कीट मिळालं......पाच किलो पीठ, तांदूळ, अर्धा किलो तेल...घरात एकूण सात माणसं..ते आता दोन-तीन दिवसांत संपून जाईल. महापालिकेचे कर्मचारी पुन्हा कधी येतील, माहीत नाही. रेशन दुकानातून हक्काचे धान्य मिळत नाही.

धान्य आणायला गेल्यानंतर मशीनवर अंगठ्याचा ठसा उमटत नसल्याचे कारण सांगत धान्य दिले नाही. धान्य पाहिजे तर जादा पैसे मोजावे लागतील, असे रेशन दुकानदार सांगतो, ही परिस्थिती आहे, पुण्यातील डेंगळे पुलाजवळील जुना तोफखाना, गांधीनगर परिसरात. कचरावेचक असलेल्या सरूबाई वाघमारे आपली व्यथा सांगत होत्या.  

प्रशासनाकडून रेशन कार्डधारकांना शंभर टक्के धान्य वाटप केल्याचा दावा केला जातो. तर, दुसरीकडे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अन्नधान्य वितरण विभागाकडून याची दखल घेण्यात येईल, अशी अपेक्षा या कार्डधारकांकडून व्यक्त करण्यात आली. पुणे शहरात अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यासाठी तीन हजार 868 टन गहू आणि 2 हजार 548 टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला. मे आणि जून महिन्यासाठी सात हजार 737 टन गहू आणि 5 हजार 96 तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
जिल्ह्यातील ग्रामीण भागात रेशन दुकानदारांकडून एप्रिल महिन्यातील संपूर्ण धान्य वितरित करण्यात आले. केशरी कार्डधारकांना मे महिन्यातील धान्याचे वाटप सुरू आहे. येत्या 25 मे पर्यंत केशरी कार्डधारकांना गहू आणि तांदूळ वाटप करण्यात येईल. त्यानंतर 25 मे पासून जून महिन्याचे धान्य वितरित करण्यात येणार आहे.
 
मोफत तांदूळ वितरण 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशन कार्डवरील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहे. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेत लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. पुणे शहर वगळता जिल्ह्यात 13 हजार 377 टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला. त्यापैकी 12 हजार 723 टन तांदूळ वितरित करण्यात आला आहे.
 
निम्म्यापेक्षा अधिक केशरी कार्डधारकांनी घेतले रेशनधान्य 

केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी घोषणा केलेली तूर आणि चणाडाळ आता रेशन दुकानात मोफत उपलब्ध होणार आहे. अंत्योदय आणि प्राधान्यक्रम गटातील कार्डधारकांना प्रतिकार्ड एक किलो डाळ मोफत मिळणार आहे. येत्या 16 मेपासून दुकानांमध्ये उपलब्ध होईल, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात केशरी कार्डधारकांना एप्रिल महिन्यासाठी 6 हजार 883 टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला. त्यापैकी तीन हजार 868 टन धान्य वितरीत करण्यात आले आहे. निम्म्याहून अधिक केशरी कार्डधारकांनी रेशनवरून धान्य घेतले आहे.
 
मोफत तांदूळ योजनेत दुकानदारांना कमिशन मिळत नाही. इतर योजनेतही कमिशन कमी करण्यात आले आहे. त्यामुळे दुकानदार आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड नसेल तरी धान्य मिळेल, अशी घोषणा केली पण त्यांना धान्य कोठून देणार? रेशन दुकानात अद्याप डाळ आलेली नाही. तूर आणि चना डाळ दोन-तीन दिवसांत येईल, असे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले. 
 

 
एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांना संपूर्ण धान्य वाटप करण्यात आले आहे. केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना मे महिन्यातील गहू आणि तांदूळ वाटप 20 मेपर्यंत करण्यात येईल. त्यानंतर 25 मेपासून जून महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना वेळेवर धान्य न देणे, पावती न देणे आणि धान्य साठ्यात अनियमितता आढळून आल्यास संबंधित रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com