भाजप नेत्याच्या मुलीने मानले आदित्य ठाकरेंचे आभार  - BJP leader's daughter thanked Aditya Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेत्याच्या मुलीने मानले आदित्य ठाकरेंचे आभार 

डॉ. संदेश शहा 
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

या विनंती पत्रावरूनच निधी मंजूर झाला आहे.

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील श्री क्षेत्र नीरा-नरसिंहपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत 28.48 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. 

जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील विकास कामांसाठी निधी मिळावा; म्हणून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना ता. 30 नोव्हेंबर 2020 रोजी निवेदनाद्वारे विनंती केली होती. या विनंती पत्रावरूनच निधी मंजूर झाला आहे, असा दावा अंकिता पाटील यांनी केला. 

याबाबत अंकिता पाटील म्हणाल्या, "बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील श्री क्षेत्र नीरा-नरसिंहपूर हे राज्यातील महत्त्वाचे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. नीरा आणि भीमा नदीच्या संगमावर वसलेले हे तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी-नरसिंह मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक येत असतात. त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्यास परिसरातील व्यवसाय उद्योगालाही चालना मिळेल. त्यामुळेच या तीर्थक्षेत्रासाठी निधी मिळावा, अशी मागणी आपण राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. ती त्यांनी मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे.'' 

दरम्यान, इंदापूर तालुक्‍यात काट्याचा राजकीय संघर्ष पहायला मिळतो. त्यामुळे मिळणारा निधी आणि विकासकामांचा श्रेयवाद या तालुक्‍यात कायम पहायला मिळतो. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यातील राजकीय संषर्घ अख्या राज्याला माहीत आहे, त्यामुळे या निधीवरूनही श्रेयवाद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख