पिंपरी महापालिकेचे ३८६६ कोटीचे रेकॉर्ड गायब

काही अधिकारी व कर्मचारीच रेकॉर्ड गहाळ करत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. याबाबत मागे ४७ अधिकाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. २०२१ चे वर्ष उजाडूनही अद्यापपर्यंत ३८६६ कोटींचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आलेली आहे.
PCMC Building
PCMC Building

पिंपरी  : श्रीमंत महापालिकेचा बेजबाबदारपणा तितक्‍याच पटीने गहाळ असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेचे २०१७ दरम्यान लेखापरीक्षण झाले. मात्र, त्यानंतरही २०२० पर्यंत कामातील कुचराई संपली नाही. या तीन वर्षातील आक्षेप घेण्यात आलेले रेकॉर्डही कोणत्याही विभागाने जमा केले नाही.

परिणामी, लेखा परिक्षणातील आक्षेपार्ह बाबी अद्यापपर्यंत तशाच आहेत. काही अधिकारी व कर्मचारीच रेकॉर्ड गहाळ करत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. याबाबत मागे ४७ अधिकाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. २०२१ चे वर्ष उजाडूनही अद्यापपर्यंत ३८६६ कोटींचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आलेली आहे.

महापालिकेच्या २०१० ते २०२० या कालावधीतील लेखापरीक्षणातील त्रुटी अद्याप दूर झालेल्या नाहीत. कोरोना काळामुळे ते अधिक लांबले. यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही महापालिकेला जाग आलेली नाही. महापालिकेत वर्षानुवर्षे बजेट मंजूर होते. कोट्यवधी रुपयांच्या कामांचे विषय स्थायीत मंजूर केले जातात. ठराव होतात. मात्र, लेखा परीक्षणावेळी वेगळीच सत्यता समोर येते. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत विभागांमध्ये रेकॉर्ड योग्य पद्घतीने जतन केलेले आहे. 

हे रेकॉर्ड डिजिटली करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, तोही प्रत्यक्षात उतरला नाही. आक्षेपार्ह प्रकरणे व रकमांच्या संख्येनेच आकडे वाढत चालेले आहेत. जुन्या प्रलंबित आक्षेपांची संख्या अधिक आहे. याबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. कामांसाठी झालेल्या विविध खर्चांच्या फायली लेखा परिक्षणाकडून तपासल्या जातात. केवळ दिखावाच सुरु असल्याचे प्रत्यक्षदर्शनी लक्षात येते. एकूण आक्षेप संख्या तीस हजारांहून अधिक आहे. आक्षेपांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कमी होण्याची चिन्हे नाहीत. लेखा विभागांच्या मते या ऑडिटलाही आक्षेपांची संख्या अधिक प्रमाणात वाढणार आहे.

करदात्यांच्या मेहनतीचा पैसा आणि महापालिकेकडे रेकॉड उपलब्ध नाही. परिणामी, कामकाजातील पारदर्शकता चव्हाट्यावर आली आहे. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यातून दिसून येत आहे. वसूलपात्र रक्कमही वसूल होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. लेखापरिक्षणाने वारंवार पत्रव्यवहार करुनही कोणाचेही रेकॉर्ड अद्यापपर्यंत उपलब्ध झाले नाही. महापालिकेतही भ्रष्टाचाराचे गुन्हे घडल्यास ईडीची चौकशी लावायला हवी अशी सर्वसामान्य करदात्यांची मागणी आहे.

एकूण प्रलंबित आक्षेप संख्या : ३९७६५
एकूण प्रलंबित आक्षेपाधीन रक्कम : ३३० कोटी ६७ लाख ४४ हजार ५८९
वसूलपात्र रक्कम : ५७ कोटी ३७ लाख ६२ हजार १५९
रेकॉर्ड उपलब्ध नाही: ३८६६ कोटी २७ हजार १२५

काय गरजेचे आहे?
अद्यापपर्यंत गुन्हे दाखल का झालेले नाहीत?
चौकशी समितीतून काय समोर आले?
दुबार फायलींचा कारभार कधी थांबणार
राज्य लेखा परीक्षक, मुख्य लोकायुक्‍त व केंद्र व राज्याची विशेष चौकशी समिती
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com