पिंपरी -चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामात स्मार्ट घोटाळा?  - Ekanath Shinde Orders probe in PCMC Smart City Issue | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरी -चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामात स्मार्ट घोटाळा? 

उत्तम कुटे
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

स्मार्टसिटीच्या कामातील ५२० कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये हा अडीचशे ते तीनशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा योगेश बाबर यांनी केला आहे. त्यामुळे हे टेंडर रद्द करून त्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची व त्यात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी नगरविकास मंत्र्यांकडे केली होती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्या कामातील अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

या गैरव्यवहारात पिंपरी-चिंचवड पालिकेतील सत्ताधारी भाजप, त्यांचे शहरातील दोन्ही आमदार, या स्मार्टसिटी कंपनीचे संचालक मंडळ यांच्या जोडीने पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे ही सहभागी असल्याचा आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी पत्रकारपरिषद घेऊन केला.

स्मार्टसिटीच्या कामातील ५२० कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये हा अडीचशे ते तीनशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा बाबर यांनी केला आहे. त्यामुळे हे टेंडर रद्द करून त्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची व त्यात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी नगरविकास मंत्र्यांकडे केली होती. त्यावर विभागाच्या प्रधान सचिवांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

सिस्टीम इंटीगेटरचे ५२० कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मंजूर झाले आहे, असे बाबर यांनी सांगितले. हे काम दिलेल्या तीन कंपन्यांपैकी एक कंपनी (क्रेस्टल इंटिग्रेटे़ड सर्व्हिसेस प्रा.लि.) ही फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार प्रसाद लाड यांची कंपनी असून या कामासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य आणि अनुभव या कंपनीकडे नसूनही तिला कसे काय हे काम कसे देण्यात आले,यावर बाबर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

आयुक्त हे भाजपधार्जिणे असून ते पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) नाही,तर या तीनशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे सीईओ आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी माजी आमदार गौतम चाबूकस्वार,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन बाबर,शहर महिला संघटीका उर्मिला काळभोर उपस्थित होत्या.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख