दिबांचे नांव पुढे करुन मनसेने केली शिवसेनेची अडचण

आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पनवेल व उरणपर्यंत विखुरलेल्या सिडको अधिग्रहीत गावांत होणार असून नवी मुंबईचे वैभव ठरणार आहे. हे विमानतळ भविष्यात शहराची ओळख होणार आहे. त्यामुळे विमानतळाला समाजातील थोर पुरूषाचे नाव देण्याची मागणी सुरुवातीपासून होत आहे
MNS Demands to give name of D. B. Patil to Navi Mumbai Airport
MNS Demands to give name of D. B. Patil to Navi Mumbai Airport

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होण्याआधीच राजकारणाच्या तावडीत सापडले आहे. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने राज्य सरकारकडे केली आहे. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून हे विमानतळ उभे राहत असल्याने प्रकल्पग्रस्तांचे थोर नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त संघटना, भाजपपाठोपाठ आता मनसेनेही केली आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दिबांच्या नावाची मागणी केल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पनवेल व उरणपर्यंत विखुरलेल्या सिडको अधिग्रहीत गावांत होणार असून नवी मुंबईचे वैभव ठरणार आहे. हे विमानतळ भविष्यात शहराची ओळख होणार आहे. त्यामुळे विमानतळाला समाजातील थोर पुरूषाचे नाव देण्याची मागणी सुरुवातीपासून होत आहे. मात्र हे विमानतळ स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांनी त्याग केलेल्या शेतजमिनींवर होणार असल्याने त्यांच्यापैकीच एका नेत्याचे नाव असावे, अशी प्रकल्पग्रस्तांची भावना आहे. दरम्यानच्या काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी सरकारकडे केल्यामुळे नवे वादंग उठले आहे.

राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याचे लक्षात घेता नावाची घोषणा होऊ नये म्हणून घाई-घाईत काही प्रकल्पग्रस्त संघटनांनी विमानतळाच्या बांधकाम क्षेत्रात थेट दि.बा पाटील यांच्या नावाच्या फलकाचेही अनावरण केले आहे. अचानक झालेल्या या कार्यक्रमामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक असल्याचे दिसून आले. प्रकल्पग्रस्तांच्या भावना लक्षात घेता, पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनीही दिबांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. विमानतळाला दिबांच्या ऐवजी दुसरे कोणाचे नाव असूच शकत नाही, अशी स्थानिकांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. या परिस्थित पनवेल आणि उरण तालुक्‍यात निवडणुका होत आहेत. 

बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपचा वरचष्मा राहिला आहे. या निवडणुका आपल्या ताब्यात घेण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेची साथ घेतली आहे. ही बाब ओळखून मनसेनेही नावाच्या वादात उडी घेत दिबांच्या नावाला पाठींबा दिला आहे. राज्यातील इतर कोणत्याही प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देता येईल. मात्र नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी नवी मुंबई मनसेतर्फे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मनसेच्या या मागणीमुळे ऐन निवडणुकीत नावावरून सुरू झालेल्या राजकारणात शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न होत आहेत.

महापालिका निवडणुकीत बसू शकतो फटका
नवी मुंबईतील जमिनी जेएनपीटी, सिडकोने १९८० च्या दरम्यान ताब्यात घेत शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना एकरी केवळ १० ते २० हजार रुपये मोबदला दिला तेव्हा दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा लढा उभारण्यात आला. १९८४ मध्ये उरण परिसरात झालेल्या आंदोलनात ५ जण शहिद झाले होते. आंदोलनाची तीव्रता पाहून सरकारला १९८४ चा ब्रिटिशकालीन अन्यायकारक भूसंपादन कायदा बदलून नवीन कायदा करावा लागला. तसेच भूमिपुत्रांना १२.५.% जमीन मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

दिबांनी आगरी कोळी समाजाला शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा, महाविद्यालये उभ्या केल्या. दि.बांनी केलेला त्याग नवी मुंबई व पनवेल-उरण मधील प्रकल्पग्रस्त विसरला नाही. ऐन निवडणुकीत सरकारने दि.बांचे नाव न दिल्यास मतांचा मोठा फटका बसू शकतो.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com