नवी मुंबई : सिडकोच्या विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व स्वयंघोषित कामगार नेते यांच्यातर्फे साडेबारा टक्के विभागात सुरू असलेली दलाली आता अडचणीत आली आहे. सिडकोच्या दक्षता विभागाने विकसकांची दलालाचे काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती मागवली आहे. साडेबारा टक्के योजनेंतर्गत सर्वे विभागातील अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या सूचना दक्षता विभागाचे तपास अधिकारी अब्दुल शेख यांनी दिल्या आहेत.
राज्यातील श्रीमंत महामंडळांपैकी एक म्हणून सिडको परिचित आहे. खासगी विकसकांनी नवी मुंबईत उभारलेल्या इमारतींच्या जाळ्यांमुळे सिडकोत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. सिडकोचे काही अधिकारी शेतकऱ्यांना भीक घालत नाहीत. आपल्याला मिळणारा हिस्सा अधिकाऱ्यांना मिळत असल्याने सिडकोत दलाल वर्ग उदयास आला आहे. सिडकोचा साडेबारा टक्के विभाग दलालांमुळेच बदनाम झाला आहे. अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यातही सापडले आहेत.
सिडकोला लागलेला हा बदनामीचा डाग धुऊन काढण्यासाठी दक्षता विभागाने मोहीम आखली आहे. या मोहिमेंतर्गत साडेबारा टक्के विभागाच्या सर्वे विभागाकडे शेतकऱ्यांसाठी दाखले आणण्यासाठी सिडकोच्या कामगार युनियनचे पदाधिकारी फेऱ्या मारत असल्याची तक्रार दक्षता विभागाला प्राप्त झाली आहे. कामगारांचे नेते असल्याचे भासवून टेबल ते टेबल फिरून ना बांधकामे दाखले घेऊन इरादापत्रक पूर्ण करून विकसकाला देत आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारीची दखल घेत दक्षता विभागाने सर्वे विभागातील अधिकाऱ्यांना दाखल्यांच्या कामासाठी येणाऱ्या सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे व माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षता विभागाच्या या आदेशामुळे साडेबारा टक्के विभागातील दलाल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
ही मागितली माहिती
बांधकामे दाखले घेण्यासाठी सिडकोतील कर्मचारी तसेच नेते मंडळींचा आपल्या विभागात वावर असतो का, विकासकातर्फे कामे करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे का, येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांची नावे आणि संबंधित फाईल क्रमांक आदी माहिती दक्षता विभागाला सादर करावी.
कारवाई की फक्त फार्स?
सिडकोत फोफावलेल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी याआधीही अनेक दक्षता अधिकाऱ्यांनी मोहिमा आखल्या होत्या; परंतु या मोहिमांतून काही ठोस कारवाया न झाल्याने त्या दिखाव्यापुरत्याच ठरल्या. आता पुन्हा दक्षता विभागाने दलाल कर्मचाऱ्यांविरोधात मोहीम आखली आहे खरे; परंतु दलालाला मिळणाऱ्या मलईत या अधिकाऱ्यांनाही वाटा मिळतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे दक्षता विभागालाही माहिती मागवल्यानंतर कोणीच माहिती न दिल्यामुळे पुन्हा स्मरणपत्र द्यावे लागले आहे.
Edited By - Amit Golwalkar

