धुळ्याच्या "डीन' पदासाठी कोल्हापुरातून "फिल्डिंग'!  - Politics again from the post of Dean of Dhule | Politics Marathi News - Sarkarnama

धुळ्याच्या "डीन' पदासाठी कोल्हापुरातून "फिल्डिंग'! 

निखिल सूर्यवंशी 
मंगळवार, 19 मे 2020

व्यथित अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे यांनी थेट बदलीची मागणी राज्य सरकारकडे केली. ते कळताच कोल्हापूर येथील अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी धुळ्यातील पदासाठी पुन्हा फिल्डिंग लावली आहे. 

धुळे ः कोरोना विषाणूशी मुकाबला सुरू असताना धुळ्यातील भाऊसाहेब हिरे वैद्यकिय शासकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातील काही प्रश्‍न तक्रारी, आंदोलनाच्या माध्यमातून ऐरणीवर आले. शिवाय नेहमीप्रमाणे राजकीय हस्तक्षेपाची चर्चा घडविली गेली. त्यामुळे व्यथित अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे यांनी थेट बदलीची मागणी राज्य सरकारकडे केली. ते कळताच कोल्हापूर येथील अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी धुळ्यातील पदासाठी पुन्हा फिल्डिंग लावली आहे. 

कोल्हापूरला बदली होण्यापूर्वी डॉ. मीनाक्षी गजभिये या धुळ्यातील हिरे महाविद्यालयात अधिष्ठाता होत्या. भाजपच्या सत्ता काळात "पीए कम मंत्र्यां'मुळे तत्कालिन अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांना नाइलाजाने मौलिक कारणासाठी निवृत्ती स्वीकारावी लागल्याची चर्चा रंगली होती. त्यांच्या निवृत्तीनंतर पद रिक्त होते. 

भाजपच्या सत्ता काळातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयाने डॉ. मीनाक्षी गजभिये यांची धुळ्यातील रिक्तपदी वर्णी लावली होती. तेव्हा डॉ. गजभिये या नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत गोवल्या गेल्यामुळे चर्चेत होत्या. मात्र. "एमसीआय'च्या निकषांची पूर्तता होण्यासाठी हिरे महाविद्यालयातील रिक्त जागा भरणेही सरकारला गरजेचे होते. त्यामुळे येथील अधिष्ठातापदी डॉ. गजभिये यांची "लॉटरी' लागल्याचे मानले गेले. 

आता काय घडेल? 

अंतर्गत कलह आणि राजकीय हस्तक्षेपासह गटबाजी असल्याने हिरे वैद्यकीय महाविद्यालय बहुचर्चित ठरत असते. त्याचा अनुभव डॉ. गजभिये आणि आता डॉ. रामराजे यांनीही घेतला. त्यात "कोरोना'शी मुकाबला करताना आंदोलने, तक्रारी होऊ लागल्याने डॉ. रामराजे व्यथित झाले. त्यांनी थेट राज्य सरकारकडे बदलीची मागणी केली. ते कळताच कोल्हापूर येथे बदलून गेलेल्या डॉ. गजभिये यांनी लागलीच धुळ्यासाठी पुन्हा "फिल्डिंग' लावल्याची चर्चा घडत आहे. त्यांच्या नियुक्तीला महाविद्यालयातील दुसऱ्या एकाचा गटाचा विरोध आहे. त्यामुळे बदलीच्या विषयात पुन्हा राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्याने वातावरण ढवळून निघते आहे. या स्थितीत "कोरोना' बाजूला पडला की काय, असा प्रश्‍न पडला आहे. 

या बदली प्रकरणात केवळ डॉ. रामराजे, डॉ. गजभिये यांचीच नव्हे; तर जळगावसह चार ते पाच अधिष्ठात्यांच्या विनंती व सामंजस्याने अदलाबदलीतून बदली होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. रस्सीखेचात वैद्यकिय व शिक्षण, संशोधन मंत्रालय काय निर्णय घेते, या कडे सर्वांचे लक्ष असेल. असे असले तरी कमी मनुष्यबळ, त्रोटक पायाभूत सुविधा असतानाही हिरे वैद्यकिय महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालय "कोरोना'शी चांगल्या पद्धतीने मुकाबला करत आहे, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख