नाशिक महापालिका घेणार, इतिहासात प्रथमचं ऑनलाईन महासभा - Nashik miniciple corporation will hold online General meeting | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिक महापालिका घेणार, इतिहासात प्रथमचं ऑनलाईन महासभा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 मे 2020

यापुर्वी कोरोनामुळे रद्द करण्यात आलेली नाशिक महापालिकेची महासभा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून येत्या 29 मेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परवानगी दिल्यानंतर आज त्याची नोटीस जारी करण्यात आली. 

नाशिक : लॉकडाउनमुळे शहरात संचारबंदी लागू आहे. कोरोनामुळे फिजीकल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. त्यामुळे ठराविक कार्यक्रम वगळता एकाच ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येत नाही. हा नियम सर्व कार्यक्रमांना लागु आहे. त्यामुळे यापुर्वी कोरोनामुळे रद्द करण्यात आलेली महासभा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून येत्या 29 मेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परवानगी दिल्यानंतर आज त्याची नोटीस जारी करण्यात आली. 

महासभा घ्यावी की नाही यावरुन भिन्न मतप्रवाह होते. त्यात काही नगरसेवकांनी आम्हाला किंवा इतरांना कोरोनाची लागण झाल्यास त्याला कोण जबाबदार राहील? असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यामुळे या महासभेविषयी अनिश्‍चितता होती. मात्र महापालिकेच्या बायलॉज प्रमाणे सलग तीन महिने महासभा न घेतल्यास कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे महासभा घेण्याची परवानगी मागण्यात आली होती. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सुचना देवून जिल्हाधिकारी मांढरे यांनी महासभेकडे चेंडू टोलावला होता.

शिवसेनेने केला होता महासभेला विरोध

महापौर सतीश कुलकर्णी यांनी सभेची तयारी केली, परंत, शिवसेना नेते व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी त्यास विरोध केला होता. त्यात सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यास व त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री महासभेची निघाल्यास जबाबदारी घेणार का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे सारेच बुचकळ्यात पडले होते. 

महापालिका आयुक्तांकडे हा विषय पाठविण्यात आला होता. त्यावर आयुक्तांनी स्पष्ट शब्दात नकार देताना, महासभेची जबाबदारी असल्याचे सुचित केले होते. त्यानंतर पुन्हा संभ्रमित अवस्था निर्माण झाली. त्यात महासभा रद्द करण्याचा निर्णय महापौर कुलकर्णी यांनी घेतला होता. मात्र आता या शंका-कुशंकांना फाटा देत आता ऑनलाईन सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२९ मे रोजी होणार महासभा

येत्या 29 मेस सकाळी साडे अकराला व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सभा होईल. त्यासाठी आयुक्तांच्या दालना शेजारील सभागृहातून आयुक्त, महापौर व उपमहापौर सभेचे नेतृत्व करतील. सदस्यांना त्यांचे प्रश्‍न व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मांडता येतील. विषयांची यादी प्रत्येकाला घरपोच दिली जाणार आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सची लिंक प्रत्येकाला अॅण्ड्रॉईड मोबाईलवर पाठविली जाईल, अशी माहिती नगरसचिव राजु कुटे यांनी दिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख