अमरावती महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांची चौकशी शासनस्तरावरून - Government Lever Inquiry initiated against four officials of Amravati | Politics Marathi News - Sarkarnama

अमरावती महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांची चौकशी शासनस्तरावरून

कृष्णा लोखंडे 
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

महापालिकेतील वैयक्तिक शौचालय घोटाळ्यात नावे आलेल्या चार शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशी शासनाकडे प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील सहा अधिकाऱ्यांची चौकशी सेवानिवृत्त अधिकारी करणार आहेत. यासाठी कुणाची नियुक्ती करावी, हे शासनाने महापालिका प्रशासनास स्पष्ट केले आहे

अमरावती : महापालिकेतील वैयक्तिक शौचालय घोटाळ्यात नावे आलेल्या चार शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशी शासनाकडे प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील सहा अधिकाऱ्यांची चौकशी सेवानिवृत्त अधिकारी करणार आहेत. यासाठी कुणाची नियुक्ती करावी, हे शासनाने महापालिका प्रशासनास स्पष्ट केले आहे. येत्या आठ दिवसांत चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त सुरेश पाटील यांनी दिली.

बडनेरा झोन अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेत सुमारे २ कोटी ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयितांना अटकेनंतर जामीन मिळाला आहे. या घोटाळ्यातील सर्व संशयित जामिनावर मुक्त आहेत.

अडीच कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात महापालिकेतील दहा अधिकाऱ्यांची नावे आली आहेत. त्यापैकी चार अधिकारी शासन नियुक्त आहेत. मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखा अधिकारी व दोन सहायक आयुक्त यांचा यामध्ये समावेश असून त्यांची प्रशासकीय चौकशी शासनस्तरावरून करण्यात येणार आहे. तर महापालिकेच्या आस्थापनेवरील आरोग्य अधिकाऱ्यांसह स्वच्छता अधिकारी, सहायक आयुक्त, उपअभियंता व स्वच्छता निरीक्षक यांची प्रशासकीय चौकशी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून चौकशी प्रारंभ होण्याचे संकेत आहेत.

शुक्रवारी (ता.१८) झालेल्या आमसभेत घोटाळ्याचा अहवाल मांडण्यात आला. सदस्यांनी यामधील अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा मुद्दा लावून धरला. हा घोटाळा नसून महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा असल्याचाही आरोप सदस्यांनी करीत प्रशासकीय चौकशीसह अंतिम अहवाल जानेवारी महिन्यातील आमसभेत पटलावर ठेवण्याची मागणी केली. महापौरांनीही तसे आदेश दिले आहेत.

हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल मागविणार
घोटाळ्यामध्ये नावे आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांची स्वाक्षरी बनावट असल्याचा दावा केला आहे. उपायुक्तांच्या अध्यक्षतेतील त्रीसदस्यीय समितीला सादर केलेल्या खुल्याशात त्यांनी तसा दावा केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासण्यात याव्या, अशी मागणी समोर आली आहे. महापालिकेस स्वतः तशी शिफारस करता येत नसल्याने घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेस पत्र देणार असल्याचे उपायुक्त सुरेश पाटील यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख