वर्धा बाजार समितीचे पाच संचालक निलंबित : पुढील सहा वर्षांकरिता निवडणूक बंदी - Five Directors of Vardha Market Committee Suspended | Politics Marathi News - Sarkarnama

वर्धा बाजार समितीचे पाच संचालक निलंबित : पुढील सहा वर्षांकरिता निवडणूक बंदी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 जानेवारी 2021

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांना परवाना देण्याकरिता असलेल्या समितीने एका व्यापाऱ्याने सादर केलेल्या कागदपत्रांची कुठलीही शहानिशा न करता त्याला परवाना दिला. या संदर्भात काही संचालकांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीअंती असलेले आरोप सिद्ध झाल्याने उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीत परवाना देणारी समितीच बरखास्त केली.

वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांना परवाना देण्याकरिता असलेल्या समितीने एका व्यापाऱ्याने सादर केलेल्या कागदपत्रांची कुठलीही शहानिशा न करता त्याला परवाना दिला. या संदर्भात काही संचालकांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीअंती असलेले आरोप सिद्ध झाल्याने उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीत परवाना देणारी समितीच बरखास्त केली.

या समितीत असलेले प्रकाश सेवकदास पाटील, शरद देवराव झोड, विजय गजानन बंडेवार, अरविंद बापूराव भुसारी आणि वैशाली अनिल उमाटे यांचे संचालक पद निष्कासित केले आहे. शिवाय त्यांन पुढील सहा वर्षांकरिता निवडणूक बंदी घातली आहे. या प्रकारामुळे येथील बाजार समिती चांगलीच चर्चेत आली आहे. हा निर्णय आदेशाच्या तारखेपासून लागू करण्याचे जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

बाजार समितीत व्यापाऱ्यांना परवाना देणाऱ्या समितीने प्रशांत गंगाधर जगताप यांना व्यापारी परवाना दिला. या व्यापाऱ्याने येथील अडत्यांचे सुमारे ८८ लाख रुपये बुडविले. या संदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली. हा सर्व व्यवहार होण्यापूर्वीच येथील काही सभासदांनी या व्यापाऱ्याने सादर केलेले कागदपत्र खोटे असल्याची तक्रार सादर केली होती. त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली होती. असे असताना या समितीने या व्यापाऱ्याला परवाना दिला.

या संदर्भात बाजार समितीच्या काही संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीवर उपनिबंधक कार्यालयाने चौकशी केली असता यात ही समिती दोषी असल्याने या पाचही संचालकांना पणन कायद्याच्या विविध कलमान्वये निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केले.

बाजार समितीच्या परवाना समितीने एका व्यापाऱ्याला परवाना देताना सादर केलेल्या कागदपत्रांची कुठलीही शहानिशा केली नसल्याच तक्रार होती. या तक्रारीची चौकशी केली असता त्यात पाच संचालक दोषी आढळले. यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक

हा आदेश हेतुपुरस्सर काढण्यात आला आहे. बाजार समितीत भाजपची सत्ता आहे. पण कॉग्रेसचे काही ज्येष्ठ नेते आपल्या हस्तकांमार्फत समितीच्या कामकाजात लुडबूड करतात. त्यांना विरोध करण्याचा हा प्रकार आहे. झालेली कारवाई ही कायद्या विरोधात आहे. विशेष म्हणजे या कारवाईत कुठेही सचिवाचे नाव नाही. यामुळे बाजार समितीचे काम सचिव चालवितात ही संचालक असा प्रश्‍न निर्माण होत आहे. या निर्णयाविरोधात शासनाकडे दाद मागणार - विजय बंडेवार, संचालक, बाजार समिती

Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख