मंत्रालयातील बैठकीत संभाजीराजेंचा अपमान झाला? : त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली ही प्रतिक्रिया

संभाजीराजे पोहोचले सभागृहात पोहोचले तेव्हा सभागृह भरलेले होते. राजेंना तिसऱ्या ओळीत शिल्लक जागा दिसली. आणि ते तिथे जाऊन बसले.राजेंनी तिसऱ्या ओळीत बसने हेनाशिकचे मराठा क्रांती समन्वयक करण गायकर यांना पसंतपडले नाही.
sambhajiraje
sambhajiraje

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नऊ जुलै रोजी (गुरूवारी) सारथी संस्थेबाबत घेतलेल्या बैठकीत खासदार छत्रपती संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसविण्याचा मुद्दा फार गाजला. त्यात छत्रपतींचा अपमान झाला म्हणून बैठकीतच काहींनी गोंधळ घातला. संभाजीराजे उशिरा आल्याने त्यांना सभागृहात तिसऱ्या रांगेत बसावे लागल्याचा मुद्दा काहींनी उपस्थित केला तर काहींनी राष्ट्रवादीच्या विरोधातील मंडळींनी हा मुद्दा तापविल्याचा आरोप केला. 

याबाबत संभाजीराजे यांच्या नजिकच्या कार्यकर्त्यांनी दुसरी बाजू मांडली आहे. तसेच अजित पवार यांच्याही पीएने चुकीची माहिती संभाजीराजेंना दिल्याचा आरोप केला आहे. या बैठकीस उपस्थित असलेल्या योगेश केदार यांनी त्यांचे म्हणणे सोशल मिडियात मांडले आहे. 

``मराठा समाजातील काही निवडक पाच जणांना घेऊन बैठकीला मुंबईला या. यातून काहीतरी तोडगा काढू असा निरोप अजित पवार यांनी संभाजीराजेंना दिला होता. त्यात नक्की कोणाला बोलवायचे यावरून वाद होण्याचा धोका होता. त्यामुळे राजेंनी आपणच ठरवा कुणा कुणाला बोलवायच ते. मी बैठकीला येतो, असा निरोप संभाजीराजेंकडून देण्यात आला. तसेच कोविडमुळे सर्वांना या चर्चेला बोलवता येत नसले, तरी व्हीडीओ काँन्फरन्स द्वारे मराठा समन्वयकांना या चर्चेत सहभागी करुन घेण्यात यावे, अशी सूचना राजेंनी केली होती. ती मान्य ही करण्यात आली. पण मान्य केल्याप्रमाणे कुणालाही व्हिडिओ कॉन्फरन्सवर घेतले नाही, असे केदार यांनी म्हटले आहे.

राजेंना परत दुसऱ्या अजितदादांच्या सचिवांचा फोन आला.  ``राजे आणि त्यांच्यासोबत एकाच व्यक्तीला परवानगी मिळेल. त्यापेक्षा  जास्त लोक आणू नका. जर जास्त लोक आले तर मी सर्व अधिकारी हे बैठकीत न घेता कॉन्फरन्सवर घेईन, असे सांगण्यात आले. तिथे राजेंनी त्या सचिवाला खडसावले की, तुम्ही प्रत्येक वेळी बदलून का बोलत आहेत? दादांनी सांगितलंय म्हणून मी येतोय. तुम्ही अशा पद्धतीने बोलायची आवश्यकता नव्हती, असे सुनावले. यामुळे संतापलेल्या राजेंनी बैठकीला जायचंच नाही, असा विचार केला. पण नंतर बदलून समाजाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी बैठकीला जाण्याचा निर्णय घेतला, असे यात म्हटले आहे.

त्यानंतर राजेंच्या बरोबर चार लोक आणण्यासाठी परवानगी असल्याचे फोनवरून कळवले. कोल्हापूर ते मुंबई प्रवास करून आठ वाजता मुंबईमध्ये पोचलो. कुठलेही हॉटेल उघडे नव्हते. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात सकाळी दहानंतर तयार होण्यासाठी जागा मिळणार होती. संभाजीराजे गाडीच्या खाली न उतरता सकाळी सव्वा दहापर्यंत मंत्रालायजवळ बसलेलो होतो. त्यानंतर मंत्रालयाच्या आवारात प्रवेश केला. शिंदे यांच्या शिपायाला यायला उशीर होत होता. मग आम्ही तसेच हसन मुश्रीफ यांच्या दालनात गेलो. पावणे अकरा झाले होते तोपर्यंत. राजे आणि आम्हाला तयार होऊन वर निघालो अन आम्ही बरोबर 11 वाजून 7  मिनिटाला सभागृहात पोचलो, असे केदार यांनी म्हटले आहे. 

राजे पोहोचले सभागृहात पोहोचले तेव्हा सभागृह भरलेले होते. राजेंना तिसऱ्या ओळीत शिल्लक जागा दिसली. आणि ते तिथे जाऊन बसले. राजेंनी तिसऱ्या ओळीत बसने हे नाशिकचे मराठा क्रांती समन्वयक करण गायकर यांना पसंद पडले नाही. त्यांनी थेट दादांना प्रश्न केला की महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपतींचे वंशज येणार आहेत हे माहिती असूनही तुम्ही त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली नाही. तुम्ही संभाजीराजेंना मंचावर बसवण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. हे तुम्ही ठीक केले नाही. तुम्ही वरती आणि आमचे राजे खाली? हे समाजाला कळलं आणि त्यांनी आम्हाला विचारलं तर आम्ही काय उत्तर देणा, असा सवाल केला. त्यात धनंजय जाधव यांनी या प्रकरणात उडी घेतली. अजितदादांनी मोठ्या आवाजात सांगितलं की तू शिकवू नको. मला माहिती आहे. कुणाला कुठं बसवायचं ते. संसदेत राजे कुठे बसतात, असे विचारले. त्यावर गायकर यांनी आक्षेप घेतला. मंचावर चार खुर्च्या ठेवायला हरकत काय होती, असा सवाल त्यांनी केला.

त्यानंतर अजितदादा म्हणाले, ``संभाजीराजे तुम्ही समोरच्या ओळीत पहिल्या रांगेत बसा.`` विनायक मेटे आणि विनोद पाटील पुढच्या रांगेत बसले होते. विनायक मेटे उठून उजवीकडे सरकले. तिसऱ्या रांगेत बसलेल्या  संभाजीराजेंनी उठण्यास नकार दिला. करण गायकरांनी वडेट्टीवारांना खुर्ची कशासाठी असा सवाल केल्याने वडेट्टीवार चिडून खाली उतरले. त्या रिकाम्या झालेल्या खुर्चीवर बसायला राजेंना अजितदादांनी बोलावलं. राजेंनी त्या गोष्टीला नकार दिला. इतर लोकांनी सुद्धा आवाज उठवला. विनायक मेटे आणि विनोद पाटील हे ही उभे राहिले. या समन्वयकांना राजेंनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी  सांगितलं की, मी कुठेही बसलो तरी फरक पडत नाही. आपण समाजाच्या कामासाठी आलोय. ते करणं जास्त महत्वाचं आहे. तरीही गोंधळ थांबत नव्हता. 

मग उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मीच खाली येतो. तुमच्या राजेंना इथे बसा म्हणा. त्या गोंधळात सुद्धा  संभाजीराजे अजितदादांना म्हणाले की, मला इथे बसायला काहीच अडचण नाही. तुम्ही सभा सुरू ठेवा. पण एक लक्षात राहू द्या, मागच्या दोन दिवसांपासून तुम्ही माझा अपमान करत आहात. तुमच्या सचिवांनी माझ्याशी उद्धट भाषेत फोनवर भाषा केली. आधी ज्या मराठा समन्वयकांना घेऊन या म्हणून तुम्हीच निरोप दिला. त्यांना त्यानंतर येऊ नका म्हणून सांगितलं. ज्यांना मी शब्द दिला होता ते लोकं नाराज होतील. माझं नुकसान होईल. याचा विचार केला नाही. तुम्ही अनेक मराठा समनव्याकांचे नाव सुद्धा घेतले नाही, ज्यांनी सारथी साठी आंदोलन केलं. ज्यांनी सारथीकरिता सतत पाठपुरावा केला. तरीही मी सहन केलं. इथपर्यंत आलो. कारण मला माझ्यापेक्षा समाज महत्वाचा होता. त्यानंतर परत राजेंनी धनंजय जाधव आणि करण गायकर ला समजावलं की, मी इथे बसलो म्हणून काहीही फरक पडणार नाही. तुम्ही शांत बसा. हा माझा आदेश आहे, असे केदार यांनी नमूद केले.

त्यानंतर अजितदादांना परिस्थितीचे गंभीर्य लक्षात आले. त्यांनी त्या सचिवाला विचारलं, तू संभाजीराजेंना तसं का बोललास? अजितदादांनी सचिवाला राजेंची माफी मागायला सांगितली. त्या सचिवांनी माफीसुद्धा मागितली. ते सर्व सभागृहाने बघितलं. त्यानंतर काही शांतता आली. बैठकीची कार्यवाही सुरू झाली. अजित पवारांनी भूमिका मांडली. त्यानंतर सर्वजण बोलत होते. राजेंद्र कोंढरे, वीरेंद्र पवार, विनोद पाटील, विनायक मेटे, गंगाधर बनबरे, करण गायकर, धनंजय जाधव, ऍड पाटील यांनी मते मांडली. तोपर्यंत या संपूर्ण गोंधळातील काही व्हिडीओ बाहेर व्हायरल झाले होते. सगळीकडे ब्रेकिंग न्यूज लागली. महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटू लागले. सोशल मिडीयावर सर्वांकडून  आक्रमकपणे निषेध व्यक्त होऊ लागला. हे अजितदादांना कुणीतरी चिठ्ठीद्वारे सांगितले, असे केदार म्हणतात.

जेव्हा राजें बोलायला उठले, तेव्हा अजित पवारच उठले. ``राजे, तुम्ही आत्ता बोलू नका. आपण आतमध्ये चर्चा करू,``असे अजितदादा म्हणाले.  राजे म्हणाले की मी आतमध्ये का बोलू? मी समाजाच्या समोर बोलतो. तरीही अजित पवार उठून खाली आले. राजेंना बोलू न देण्याचा प्रकारही समन्वयकांना आवडला नाही. परत खटके उडाले. अजित पवारांनी खाली येऊन राजेंना  कॉन्फरन्स रूममध्ये येण्याची विनंती केली आणि हे सांगितलं की संभाजीराजे, विनोद पाटील, विनायक मेटे, राजेंद्र कोंढरे यांनीच कॉन्फरन्स रूमला यायचं. राजेंनी पुन्हा मनाचा मोठेपणा दाखवत काँन्फरन्स रुममध्ये चर्चेसाठी जायचे ठरवले. हॉलच्या बाहेर पत्रकार होतेच. त्यांनी आतमध्ये काय घडलं याविषयी विचारणा केली. ``आपला अपमान केला गेला, मीटिंग अर्धवट झाली, आपली प्रतिक्रिया काय? राजेंनी यावर सांगितले की मी आत्ताच काही बोलणार नाही. तिकडे काय घडतं हे बघू. त्यानंतर बोलेन. तरीही संभाजीराजे या वादावर नंतर काही बोलले नाहीत. त्यांनी हा वाद वाढविला नाही. यात त्यांचा मोठेपणा दिसतो, असे केदार यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com