नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान खात्याकडून आलेल्या नोटिशीनंतर ट्वीटर इंडियाने आता शेतकरी आंदोलनाशी संबंधित ट्वीटर खाती बंद करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सातशेहून अधिक खाती बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जर ही खाती बंद केली नाहीत तर ट्वीटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठ्या दंडाची तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा माहिती तंत्रज्ञान खात्याने ट्वीटरला दिला आहे.
We have withheld some of the accounts identified in the blocking orders under our Country Withheld Content policy within India only. These accounts continue to be available outside of India. https://t.co/uQuXNtzq9t
— Twitter Safety (@TwitterSafety) February 10, 2021
माहिती तंत्रज्ञान खात्याने ज्या कलमाखाली ट्वीटरला नोटिस पाठवली आहे, त्या कलमानुसार सात वर्षे तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या तसे काही विशिष्ट हेतूने सुरु असलेल्या सोशल मिडियावरच्या मोहिमा बंद कराव्यात असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ट्वीटरला सांगितले आहे. त्यानुसार #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगने चालवली जाणारी शंभरहून अधिक ट्वीटर खाती बंद करण्यात आली आहेत. पाकिस्तानी-खलिस्तानी चळवळीशी संबंधित असलेली पाचशेहून अधिक खातीही ट्वीटरने बंद केली आहेत. पाकिस्तानी -खलिस्तानी चळवळीशी संबंधित हजाराहून अधिक खाती असल्याचा संशय सरकारने व्यक्त केला आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करत असतानाच देशाचा कायदा पाळणे हे आमचे कर्तव्य असल्याचे ट्वीटरच्या प्रवक्त्याने भारत सरकारच्या सूचनेनंतर सांगितले आहे. आम्हाला जर रितसर कायदेशीर मार्गाने खाती बंद करण्याबाबतची विनंती आली तर आम्ही ट्वीटरची नियमावली आणि देशाचे कायदे यांचा विचार करुन संबंधित खात्यांवरील मजकूर तपासून खाती बंद करण्याची कार्यवाही करु, असेही या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
आम्ही वृत्तसंस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी यांची खाती बंद केलेली नाहीत. आम्ही आमच्या खातेदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करत असतो. आम्ही भारतीय कायद्यांतून याबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही ट्वीटरने म्हटले आहे. जी खाती बंद करण्यात आली आहेत ती भारतीय सीमेपुरती असून देशाबाहेर ही खाती दिसत राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Edited by - Amit Golwalkar
Edited by - Amit Golwalkar

