Central Government Plans Coal Mine Near Chandrapur Tiger Reserve
Central Government Plans Coal Mine Near Chandrapur Tiger Reserve

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात लगत कोळसा खाणीचा घाट?

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर तालुक्‍यातील बंदर या कोळसा ब्लॉकला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही खाण होऊ नये, यासाठी माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर तालुक्‍यातील बंदर या कोळसा ब्लॉकला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचा लिलाव होणार आहे. जर ही कोळसा खाण सुरू झाली तर ताडोबातील वाघांचे अस्तित्व धोक्‍यात येईल. हा परिसर वाघांचा भ्रमण करण्याचा मार्ग आहे. वाघ या मार्गानेच अन्य व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर करू शकतात. याठिकाणी जर कोळसा खाण सुरू झाली तर त्यामुळे वाघांच्या हालचालीवर मर्यादा येणार आहेत. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी याबाबत ट्वीट करून चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना जयराम रमेश यांनी पत्रही लिहीले आहे.

४१ कोळसा ब्लाॅकच्या लिलावाला परवानगी

केंद्र सरकारने ४१ कोळसा ब्लॉकच्या लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यात ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकचाही समावेश आहे. हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील आहे. याच मार्गावर वर्धा येथील बोर व्याघ्रप्रकल्प आणि अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प लागतो. त्यामुळे वाघांचे एका प्रकल्पातून दुसऱ्या प्रकल्पात स्थलांतर होऊ शकते. हा वाघांचा भ्रमणमार्ग आहे. वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी हा भ्रमणमार्ग अतिशय महत्वाचा असतो. 

मानव व वाघ यांच्यात होऊ शकतो संघर्ष

ताडोबाच्या उत्तर दिशेला असलेला हा परिसर अरुंद आहे. त्यात आता या ठिकाणी कोळसा खाणीला मंजूरी दिली तर उत्तरेकडील ताडोबा क्षेत्रातील वन्यजीवांचे स्थलांतर पूर्णपणे थांबणार आहे. त्यामुळे मानव-वाघ यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचू शकतो. ताडोबात वाघांच्या वाढत्या संख्येने वाघांचा ही परिस्थिती ओढविली आहे. वाघांच्या हल्ल्यात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळात जिल्ह्यात चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील काळात ही परिस्थिती आणखी स्फोटक होऊ शकते. त्यामुळेच आता केंद्राने जाहीर केलेल्या बंदर कोळसा ब्लॉक बाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

जयराम रमेश यांनी लिहिले पर्यावरण मंत्र्यांना पत्र

माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनीही ट्वीटद्वारे या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हा परिसर  ताडोबाला लागून असल्याने कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी  कोळसा उत्खननाला परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. 'सेव्ह ताडोबा' अशी हाक त्यांनी आपल्या ट्वीट द्वारे दिली आहे. वन्यजीवप्रेमींकडून देखील या मुद्यावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी कोळसा उत्खननासाठी मंजुरी दिली  गेली तर संख्येत वाढ झालेल्या वाघांमध्ये हद्दीसाठी आपापसात संघर्ष निर्माण होणार हे नक्की आहे. 

अदानी समुहाला कोळसा ब्लाॅक देण्याचा झाला होता प्रयत्न

त्यात अनेक वाघांचा जीव जाऊ शकतो. त्यातून मानव व वन्यजीव यांच्यातला संघर्षही शिगेला पोहोचणार आहे. वाघांच्या प्रजननावरही  मर्यादा येऊ शकते.  कारण वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च प्राणी असल्याने ही अत्यंत धोकादायक परिस्थिती असेल. वाघ हा जंगलाचा तो केंद्रबिंदू आहे. तोच जर संपला तर पर्यावरणाच्या असंतुलनाची फळे भोगावी लागतील. अदानी समूहाला २०१० -२०११ मध्ये चंद्रपूर शहलागत ताडोबाच्या बफर झोन मध्ये कोळसा ब्लॉक देण्याच्या प्रयत्न झाला होता. त्यावेळी चंद्रपुरात मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. त्यावेळी तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश स्वत: येथे आले होते आणि त्यांनी हा प्रस्ताव रद्द केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com