ब्रिटनच्या विमानांवरील बंदी आठवडाभरासाठी वाढवली - Central Government Extended Ban on Flights from Britain | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रिटनच्या विमानांवरील बंदी आठवडाभरासाठी वाढवली

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

केंद्रीय मुलकी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्विट करून ब्रिटनच्या विमानांवरील तात्पुरती (अस्थायी) बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढविल्याची माहिती दिली. त्यांनी याबाबतचे संकेत  दिले होते. काल वाढीव बंदीची तारीख जाहीर केली.

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या व जाणाऱ्या यच्चयावत विमानांवरील बंदी उद्यापासून (ता.३१) आणखी आठवडाभरासाठी म्हणजे ७ जानेवारीपर्यंत (गुरूवार) वाढवली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराने भारतातही हातपाय पसरण्यास सुरवात केल्याचे दिसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मुलकी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्विट करून ब्रिटनच्या विमानांवरील तात्पुरती (अस्थायी) बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढविल्याची माहिती दिली. त्यांनी याबाबतचे संकेत  दिले होते. काल वाढीव बंदीची तारीख जाहीर केली. ब्रिटनमध्ये आढळलेल्या व अधिकवेगाने पसरणाऱ्या नव्या कोरोनावताराची लागण झालेल्या भारतीयांची संख्या २० पर्यंत वाढली आहे. त्यानंतर आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करून दोन्ही देशांतील विमानसेवा पूर्ववत करण्याचा सरकारचा विचार आहे. त्याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल. 

भारतात नव्या कोरोनावताराने संक्रमित असलेल्यांची संख्या काल (मंगळवारी) ६ वर होती ती आज २० वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. ब्रिटनमधून २३ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या काळात आलेल्या येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्याचे केंद्राने ठरविले. मात्र त्याआधी तिकडून आलेल्यांच्या शरीरातही या विषाणूने चंचूप्रवेश केला असू शकतो अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापावेतो डेन्मार्क, नायदरलॅंड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्विटझरलॅंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनान व सिंगापूर देशांनी नवा कोरोनावतार आपल्याकडेही आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख