पाचवीच्या पुस्तकात तिसरीचा बारकोड; बालभारतीचा भोंगळ कारभार - Many Mistakes in Balbharati Book Bar Code | Politics Marathi News - Sarkarnama

पाचवीच्या पुस्तकात तिसरीचा बारकोड; बालभारतीचा भोंगळ कारभार

संदीप लांडगे
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

पुस्तकातील प्रत्येक धड्याच्या शेवटी दीक्षा ॲपचा वापर करण्यासाठी बारकोड छापण्यात आला आहे. विद्यार्थ्याला ते प्रकरण किंवा धडा मोबाईलच्या माध्यमातून समजून घेता यावा, यासाठी बारकोडचा उपयोग विद्यार्थी, शिक्षक करतात. परंतू, या बारकोडमध्येही मोठ्या चूका आढळून येत आहेत.

औरंगाबाद : बालभारतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात. परंतू,  या पुस्तकात अनेक चुका झाल्याचे समोर येत आहे. इयत्ता पाचवी इंग्रजी माध्यम इव्हीएसच्या पुस्तकात देण्यात आलेले अनेक बारकोड स्कॅन केले असता इयत्ता तिसरीच्या इव्हीएसच्या पुस्तकातील धड्यांची माहिती दिसत असल्याचा अजब प्रकार समोर येत आहे.

पुस्तकातील प्रत्येक धड्याच्या शेवटी दीक्षा ॲपचा वापर करण्यासाठी बारकोड छापण्यात आला आहे. विद्यार्थ्याला ते प्रकरण किंवा धडा मोबाईलच्या माध्यमातून समजून घेता यावा, यासाठी बारकोडचा उपयोग विद्यार्थी, शिक्षक करतात. परंतू, या बारकोडमध्येही मोठ्या चूका आढळून येत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यभर ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी, शिक्षक विविध माध्यमांचा वापर करत आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरत असलेल्या बालभारतीच्या पुस्तकात विविध चुका आढळून येत आहेत. पुस्तकातील प्रत्येक धड्याच्या शेवटी बारकोड देण्यात आला आहे. हा बारकोड स्कॅन केल्यानंतर संबंधित धड्याची माहिती विद्यार्थ्यांना दीक्षा ॲपच्या माध्यमातून मोबाईलवर मिळते.

राज्यमंडळाच्या इयत्ता पाचवीच्या इव्हीएसच्या पुस्तकातील अनेक प्रकरणाच्या शेवटी देण्यात आलेले बारकोड स्कॅन केले असता इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील विज्ञानाचे प्रकरणे दाखवले जात आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. मागील महिन्यात ऑनलाईन शिकवताना एका शिक्षकाला गणिताच्या पुस्तकात चूका आढळल्या होत्या.

सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहे, असे असताना विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. धड्याची अधिक माहिती मिळावी यासाठी विद्यार्थी दीक्षा ॲपचा वापर करत आहेत. मात्र, पुस्तकात देण्यात आलेल्या बारकोड चुकीचे असल्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित धड्याची चुकीची माहिती मिळत आहे. याबाबत बालभारतीच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उत्तर देण्याचे टाळण्यात आले.

बालभारतीकडून पुस्तक छपाईसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. छपाई करताना पुस्तकाची प्रत तज्ज्ञांकडून तपासली जाते. मात्र, पाचवीच्या इंग्रजी माध्यम इव्हीएसच्या पुस्तकाची छपाई करताना हा प्रकार कोणाच्या का लक्षात आला नाही? पुस्तकातील बारकोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्यात येत असल्याची बाब बालभारतीचे विवेक गोसावी यांना सांगीतली असता, त्यांनी देखील चूक मान्य केली - एस.पी. जवळकर - सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख