दोन सख्खे भाऊ IAS झाले... गडचिरोलीतील डांगे बंधूंचा पराक्रम - two brothers who hails from Gadchiroli become IAS officer | Politics Marathi News - Sarkarnama

दोन सख्खे भाऊ IAS झाले... गडचिरोलीतील डांगे बंधूंचा पराक्रम

महेश जगताप
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

गडचिरोलीतील दोन सख्ख्या बंधंनी आयएएसपर्यंत धडक मारणे खरेच कौतुकास्पद आहे.

पुणे : राज्यात गेल्या दोन दिवसापासून डांगे बंधूंची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे .त्याला कारण आहे महाराष्ट्राच्या प्रशासनात एकाच वेळी दोन सख्खे भाऊ `आयएएस` म्हणून काम करणार आहेत. महाराष्ट्रातील 23 अधिकाऱ्यांना आयएएस अधिकारी म्हणून काल बढती मिळाली. त्यात प्रदीपकुमार डांगे यांचा समावेश होता. डांगे यांचे थोरले भाऊ चंद्रकांत डांगे हे या आधीच आयएएस झाले आहेत. 

राज्याच्या प्रशासकीय सेवेत 75 टक्के अधिकारी हे थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस होतात. तर उरलेले 25 टक्के अधिकारी हे राज्य सेवेतून बढती देऊन केले जातात. यातील बहुतांश अधिकारी हे उपजिल्हाधिकारी दर्जाचे असतात. 

डांगे कुटुंब हे मूळचे आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील. या जिल्ह्याची वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मुख्य ओळख ही प्रचंड फोफावलेला  नक्षलवाद म्हणूनच होती. अशा परिस्थितीमध्ये वडील ग्रामसेवक म्हणून नोकरी करत होते. वडिलांची जशी बदली होत होती  तशा या दोन बंधूंच्या शाळाही बदलत होत्या. माध्यमिक शिक्षण हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शाळांत झाले.  वडील सरकारी नोकरीत  असल्याने यांच्यावर प्रशासनाचा लहानपणापासूनच संस्कार पडला होता. त्यामुळे आपोआपच प्रशासनाकडे जाण्याचा या डांगे बंधूंचा कल निर्माण झाला. दोघांनीही आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं होतं

चंद्रकांत हे आयआटी खरगपूर येथून इंजिऩिअर तर प्रदीप मुंबईतून व्हेटर्नरी डाॅक्टर झाले. त्यांनी कॉलेजमध्येच असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या  अभ्यासास सुरुवात केली. पण यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर १९९५ मध्ये चंद्रकांत हे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी झाले. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रदीप यांचीही उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. एका वर्षाच्या फरकाने दोघे भाऊ उपजिल्हाधिकारी झाल्याचे कौतुक सर्वत्र झाले. त्यानंतर ते अशाच क्रमाने `आयएएस`ही झाले.

पदे येतात आणि जातात पण आपण केलेले काम कायम टिकून राहते. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये मेळ घालून कायम  लोकाभिमुख  दोघांनीही सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे  चंद्रकांत डांगे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. आमच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण असल्याच्या भावना प्रदीप यांनी व्यक्त केल्या. आम्ही ज्या परिस्थितीमधून शिक्षण घेतलं. आज त्याचं कुठेतरी चीज झालं. यापुढेही चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मीरा-भाईंदर पालिकेच्या आयुक्तपदावरून चंद्रकांत डांगे यांची बदली झाल्याने ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर प्रदीप डांगे यांची नव्यानेच स्थापन झालेल्या महाज्योती प्रोजेक्टचे व्यवस्थापकी संचालक म्हणून नियुक्त झाले आहेत. त्या आधी ते भंडारा येथील जातपडताळणी समितीवर होते. चंद्रकात यांना 2010 चे केडर मिळाले आहे. प्रदीप यांना 2011 किंवा 2012 चे केडर मिळू शकते.  

दोन भाऊ आयएएस झाल्याचे उदाहरण याआधीही प्रशासकीय सेवेत घडले आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी राहिलेले एस. बी. पाटील आणि विलास पाटील हे दोघे मूळचे चंदगड (जि. कोल्हापूर) येथील असलेले बंधू हे पदोन्नतीने आयएएस झाले.  त्यातील एस. बी. पाटील सध्या हे मुंबईच्या महसूल प्राधिकरणाचे सदस्य आहेत आणि विलास पाटील हे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव आहेत. त्यांचे तिसरे बंधू संजय पाटील हे पुण्यात उपजिल्हाधिकारी आहेत. 

आयएएसमध्ये काल  बढती जाहीर झालेल्या इतर अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे

यु. ए. जाधव
विजयकुमार पंढरीनाथ फड,
कान्हू हरिश्चंद्र बगाटे
भानुदास बन्सी दांगडे,
किसन नारायणराव जावळे
श्यामसुंदर लिलाधर पाटील
दिलीप विरपाशप्पा स्वामी
संजय रामराव चव्हाण
सिद्धराम करबसय्या सालीमथ
रघुनाथ खंडू गावडे
किशोर सदाशिव तावडे
प्रमोद बबनराव यादव
कविता विश्वनाथ द्विवेदी
सुधाकर बापूराव तेलंगी
मंगेश वसंत मोहिते
शिवानंद त्रिंबक टाकसाळे
राजेंद्र शंकर क्षीरसागर
प्रवीण कुंडलिक पुरी
विनय सदाशिव मून
प्रदीपकुमार कृष्णराव डांगे
वर्षा दामोदर ठाकूर,
अनिल गणपतराव रामोद
सी. डी. जोशी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख