`अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या निधनाच्या कारणांची चौकशी करावी` - reasons behind death of additional collector gaykawad should be probed` | Politics Marathi News - Sarkarnama

`अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या निधनाच्या कारणांची चौकशी करावी`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 7 मे 2020

अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांची आठ महिन्यांपूर्वीच पुण्यात बदली झाली होती. आज त्यांचे निधन झाले. 

पुणे : पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव  गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज  निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने प्रशासनात चर्चा सुरू असतानाच आता त्यांविषयी आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. 

गायकवाड यांची साताऱ्यातून आठ महिन्यांपूर्वी पुण्यात बदली झाली होती. चार दिवसांपूर्वी त्यांची पुण्यातून अचानक पिंपरी-चिंचवड पालिकेत बदली करण्यात आली होती. त्या विरोधात त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली होती. मॅटचा निकाल गायकवाड यांच्या बाजूने लागला. कोरोनाच्या परिस्थितीत काम करत असताना बदलीचा ताणही त्यांच्यामागे होता, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांच्या निधनाच्या कारणांची चौकशीची मागण केली आहे. त्यासाठी त्यांनी विविध मुद्दे मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका त्यांच्या बदली संदर्भात झालेल्या राजकारणामुळे आल्याचे बोलले जाते. याच्यात किती खरं किती खोटं हे नंतर  ठरेल. परंतु या प्रकरणात  नेमकं काय घडलं असावं याचा मात्र राज्य शासनाने तपास केलाच पाहिजे.

``यातील सगळ्यात महत्त्वाची बाब ३० एप्रिल रोजी गायकवाड यांची बदली करण्यात आली. ३० एप्रिल म्हणजे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा जिकिरीचा काळ. असे असताना या काळात त्यांची बदली अचानक करण्याचे काय कारण होते? सहा महिन्यांपूर्वीच त्यांची पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती. त्यामुळे त्यांची बदली लगेच करण्यामध्ये काय संयुक्तिक कारण होते? त्यांच्या बदलीला सिव्हिल सर्व्हिसेस बोर्डाची मान्यता घेतली होती का? आणि बोर्डाने मान्यता दिली असेल तर ती कशाच्या आधारावर दिली? कोणकोणत्या नियमांचे  पालन केले गेले? आणि कोणते नियम डावलले गेले ?आणि ते का  डावलले गेले, याची चौकशी झाली पाहिजे, असे कुंभार यांनी म्हटले आहे. 

राज्यामध्ये  बदलीसंदर्भात कायदा आहे. परंतु या कायद्याची पायमल्ली कशा पद्धतीने होते याचं गायकवाड यांची बदली म्हणजे हे एक उत्तम उदाहरण आहे.  बरं गायकवाड  यांची बदली  नियमित आणि सर्वांसोबत झाली असेही नाही. गायकवाड यांच्या बदली संदर्भात जो आदेश आलेला आहे त्यामध्ये  'राज्यातील  कोरोना संसर्ग रोखण्या विषयीच्या कामकाजाचे गांभीर्य, तातडीची निकड व अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन सदर आदेश निर्गमित करण्यात येत आहेत,'  असा उल्लेख आहे. म्हणजे नेमकं काय? म्हणजे गायकवाड यांचे कोरोना व्हायरस संदर्भातील काम समाधानकारक नव्हतं असं म्हणायचं आहे का? आणि तसं असेल तर मग त्या संदर्भात त्यांच्याशी काय पत्रव्यवहार झाला किंवा त्यासंदर्भात काही चौकशी करण्यात आली का ? याचीही चौकशी झाली पाहिजे
एकीकडे कोरोनामुळे बदल्या आणि  बढत्यांना  स्थगिती  दिल्याचे बोलले जात होते. मग फक्त गायकवाड यांच्या बदलीसाठी हा निर्णय बदलण्यात आला का? किंवा गायकवाड यांच्या बदलीनंतर मुळे बदल्या  आणि  बढत्यांना  स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात, असे कुंभार यांनी म्हटले आहे.

या बदलीला गायकवाड यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते आणि मॅटने त्यास स्थगिती दिली होती. त्यानंतर गायकवाड यांनी काल (बुधवार ) पुन्हा पदाचा चार्ज घेतला होता. `मॅट`मध्ये जाणे हे संघर्षाचे लक्षण समजले जाते आणि अशा रितीने वरिष्ठ अधिकारी केल्याबद्दल बदलीला आव्हान देणे हे कोणत्याही अधिकाऱ्याच्या दृष्टीने अत्यंत धोक्याची बाब असते. त्यामुळे गायकवाड यांच्यावर `मॅट`मधील प्रकरण जास्त ताणू नये ते ताणले गेल्यास काही अधिकाऱ्यांवर आणि  शासनावर ताशेरे येण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन कोणी दबाव आणला होता का? आणि त्या दबावामुळे गायकवाड यांना  हृदयविकाराचा झटका बसला का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. मुळात कोरोना व्हायरस लढण्यासाठी  संपूर्ण राज्य लढत असताना   गायकवाड यांच्या बदलीची गरज होती का आणि केली असेलच तर ती कुणाच्या दबावाने केली याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख