ठाण्याजवळील बुलेट ट्रेनचा प्रवास आणखी लांबणीवर - Land Allocation for Bullet Train Stayed by Thane Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ठाण्याजवळील बुलेट ट्रेनचा प्रवास आणखी लांबणीवर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

ठाणे महापालिकेने आपल्या नावे असलेला शिळ येथील भूखंडापैकी एक भूखंड नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनला हस्तांतरित करण्याचे निश्‍चित केले आहे. याबदल्यात पालिकेला सहा कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी मागील आठवड्यात झालेल्या महासभेत मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता; मात्र त्याला स्थगिती देण्यात आली आहे

ठाणे : शहराजवळील बुलेट ट्रेनचा प्रवास आता अधिक खडतर झाला आहे. पालिकेच्या ताब्यातील एक भूखंड बुलेट ट्रेनच्या कामासाठी देणे अपेक्षित होते. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून प्रस्तावही तयार करण्यात आला होता; मात्र गेल्या आठवड्यातील सभेत हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता ठाणेकरांचा बुलेट ट्रेनचा प्रवास आणखी लांबणीवर पडणार आहे.

ठाणे महापालिकेने आपल्या नावे असलेला शिळ येथील भूखंडापैकी एक भूखंड नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनला हस्तांतरित करण्याचे निश्‍चित केले आहे. याबदल्यात पालिकेला सहा कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी मागील आठवड्यात झालेल्या महासभेत मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता; मात्र त्याला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा मार्ग आणखी लांबणीवर पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला शिळ येथील मार्गाला विरोध झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात बुलेट ट्रेनच्या कामात अडथळा आला होता, पण त्यानंतर काही प्रमाणात राजकीय विरोध कमी झाला होता. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रवास आता सुरळीत होईल असे मानले जात होते. त्यात आता खोडा निर्माण झाला आहे.

शिळ भागातून ४० मीटर विकास आराखड्यातील रस्ता असून, त्यावर कल्याण रोड ते एमआयडीसी रोड उड्डाणपुलाच्या बांधकामास एनएचएसआरसीएल यांनी यापूर्वीच एमएमआरडीएला मान्यता दिली आहे. त्यामुळे हा भूखंड एनएचएसआरसीएलकडे हस्तांतरित करण्यास एमएमआरडीएची हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आता या भूखंडाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या सहा कोटी ९२ लाख ८२ हजारांची रक्कम पालिकेला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. हा प्रस्ताव चर्चेला येताच राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी या प्रस्तावाबाबत मत मांडण्यास सुरुवात केली, परंतु हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येत असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

भाजप नगरसेवकांची चुप्पी
महापौरांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादीकडून तात्काळ स्वागत करण्यात आले, पण बुलेट ट्रेन हा केंद्रातील भाजप सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या विषयावर भाजपचे नगरसेवक आक्रमक होणे अपेक्षित होते, मात्र या विषयावर सध्या तरी भाजप आक्रमक झालेली नसल्याचे पाहावयास मिळाले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख