Valentine Day : पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते अन् किशोर रक्‍ताटे यांची प्रेमकहाणी  - Valentine Day: Love story of Superintendent of Police Tejaswi Satpute and Kishor Raktate | Politics Marathi News - Sarkarnama

Valentine Day : पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते अन् किशोर रक्‍ताटे यांची प्रेमकहाणी 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

अवघा एकदिवसीय ट्रेक होता. त्यात मैत्री जुळली आणि साडेतीन वर्षांनंतर आम्ही विवाहबंधनात अडकलो... कायमस्वरुपी साथीदार म्हणूनच'.

उपळाई बुद्रुक : 'तेजूची अन्‌ माझी पहिली भेट २००९ च्या प्रजासत्ताक दिनी झाली. आम्ही भेटलो ट्रेकच्या निमित्ताने. ढाकभैरी या ठिकाणी आमचा ट्रेक गेला होता. त्यावेळी मी रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझमचा डिप्लोमा आणि राज्यशास्त्र विषयात एम. फिल. करत होतो, तर तेजू पुण्याच्या आयएलएस महाविद्यालयातून कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत होती. अवघा एकदिवसीय ट्रेक होता. त्यात मैत्री जुळली आणि साडेतीन वर्षांनंतर आम्ही विवाहबंधनात अडकलो... कायमस्वरुपी साथीदार म्हणूनच'.

एका दिवसाच्या भेटीने कोणातही मैत्री होऊ शकेलच असे नाही. मात्र नाती घट्ट करणारे काही धागे असे असतात की, ज्यामुळे मैत्री व्हायला दिवस तर खूप झाला, काही तासांतच ती होऊ शकते. आमच्यात अगदी तसेच झाले. त्याचे खरे कारण आमचा नगरी धागा... माझ्या गप्पाडदास स्वभावाने आणि तेजूच्या मनमिळावू स्वभावाने आमच्यात मैत्रीची एक वीण उभी केली... 

सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व किशोर रक्ताटे यांची प्रेमकहाणी त्यांचे पती किशोर यांनी शेअर केली. २८ जून २०१२ ला तेजू (सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते) आणि मी विवाहबद्ध झालो. आमची लग्नाआधीची मैत्री तब्बल साडेतीन वर्षांची. आता आम्ही एकमेकांच्या आयुष्याचे साथीदार म्हणून कायमचे मित्र बनलो आहोत. आमचा विवाह आम्हा उभयतांसाठी लव्ह-मॅरेज आहे; मात्र आमच्या कुटुंबीयांसाठी ते अरेंज मॅरेज आहे. आम्ही आमच्या विवाहाला लव्ह-मॅरेज मानतो, याचे कुटुंबीयांना दुःख नाही आणि ते आमच्या विवाहाला अरेंज मॅरेज मानतात यात आम्हाला काहीही अडचण वाटत नाही. 

आमची कुटुंबं प्रथा, परंपरा व संस्कृतीच्या प्रेमात अडकलेली आहेत. आम्हीही त्यातच वाढलो आहोत. भेटी विरळच पण परिणामकारक... पहिल्या भेटीने तेजूविषयी माझ्या मनाला काहीतरी वेगळीच जाणीव करून दिलेली होती. त्याचाच भाग म्हणून अधून-मधून तेजूचे काय चाललेय हे मी जाणून घेत राहिलो. त्या त्या निमित्ताने आम्ही बोलत राहिलो. त्या बोलण्यातून एकमेकांना थोडक्‍यात कळत गेलो. तेजू भेटण्याच्या अगोदर माझ्याभोवती बरा परिचय असलेल्या असंख्य मुली होत्या. त्यापैकी मैत्रिणीची जागा घेतलेल्या विरळच. 
 
तेजूच्या बोलण्यातील आत्मविश्वास, विचारातील स्पष्टता, कुटुंबीयांबद्दलची आत्मियता आणि एकूणच नैसर्गिक संवेदनशीलता या साऱ्याच गोष्टींनी माझ्या मनाला भुरळ पाडली होती. आयुष्याला सर्वार्थाने समर्पक होईल असे खूप काही तिच्यामध्ये आहे, असे मनाला पटले होते. सगळ्या बाबींचा विचार करुन आम्ही विवाहबद्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

बेरोजगारीमुळे प्रपोजची हिंमत केली नाही

मी त्यावेळी बेरोजगार असल्याने तेजूला प्रपोज करण्याची हिंमत केली नाही. भावना विकसित व्हायला पैसे लागत नाही, पण भावना जगायला मात्र स्वतःच्या कमाईची तजवीज असायला हवी, अशी माझी धारणा होती. तेजूला केवळ प्रपोज करून बघायचे नव्हते, तर तिची कायमची साथ मिळवायची होती, म्हणून आपण करिअरच्या दृष्टीने जरा सोयीला लागल्यावर प्रपोज करू असे मनाने ठरवून टाकले होते.

मी दिल्लीहून अवघ्या एका दिवसासाठी दिल्ली-पुणे फ्लाईट्‌ने पुणे गाठले. तिथून शेवगाव... पाच तास बसचा प्रवास... मनात धाकधूक... अखेर मध्यरात्री शेवगावला पोचलो... रात्री झोप घेऊन सकाळी पॅनेलला सामोरे जायचे होते... कशीबशी रात्र कटवली... सकाळी मोठ्या आत्मविश्वासाने मुलाखतीच्या पॅनेलला सामोरे गेलो... पॅनेलचे चेअरमन होते तेजूचे मामा... सैन्यातून निवृत्त झालेले आणि व्यवसायात रमलेले... नात्यांच्या वरकरणी समजुतीबरोबर भोवतालचे जग बऱ्यापैकी माहीत असलेले... त्यांच्या आगमनाबरोबरच थोडीशी मनात धडकी भरली... थोडा वेळ असे वाटले की, हा सैन्यदलातील माणूस आहे. सरळ मुलाखत घेतात की अजून काही... मात्र त्यांनी अगदी मी राज्यशास्त्र विषय विशेष विषय म्हणून का घेतला इथपासून सुरुवात केली. बऱ्याच चर्चानंतर आमच्या 
लग्नावर निर्णय झाला.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख