दोन जिवलग मित्रांच्या यशाची चर्चा भाव खाऊन गेली; एकाच वेळी झाले उपजिल्हाधिकारी

दोघांनी अभ्यासाला सुरवात केली. दोन वर्षात एकाला पोस्ट मिळाली. नंतर आणखी पोस्ट मिळत गेल्या. मात्र, दुसऱ्या मित्राला यश मिळत नव्हते. यावेळी मात्र सोनियाचा दिन आला आणि दोघे जिवलग मित्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी झाले.
दोन जिवलग मित्रांच्या यशाची चर्चा भाव खाऊन गेली; एकाच वेळी झाले उपजिल्हाधिकारी
mpsc-youth

पुणे : दोन जिवलग मित्र. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला एकाच वर्गात. एकाच ब्रँचला. दोघेही वर्गात मेरीटला एकामागे एक. दोघांनाही कॅम्पस प्लेसमेंट मिळाली. मात्र, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी दोघांनी एकाचवेळी नोकरी सोडली आणि स्पर्धा परीक्षेच्या महासागरात उडी घेतली.

दोघांनी अभ्यासाला सुरवात केली. दोन वर्षात एकाला पोस्ट मिळाली. नंतर आणखी पोस्ट मिळत गेल्या. मात्र, दुसऱ्या मित्राला यश मिळत नव्हते. यावेळी मात्र सोनियाचा दिन आला आणि दोघे जिवलग मित्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी झाले.

बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडराजाचे एकनाथ बंगाळे व सोलापूर जिल्ह्यातील मोरोचीचे हरीश सूळ या दोन मित्रांची ही कहाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणारी आहे.

बंगाळे व सूळ हे पिंपरीतील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी. अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यानंतर दोघांची ओळख झाली. चार वर्षाच्या काळात दोघांची चांगली मैत्री झाली. जिवाभावाचे मित्र झाले. बीई मेकॅनिकल पूर्ण केल्यानंतर दोघांनाही कॅम्पस प्लेसमेंट मिळाली होती. मात्र, नोकरी सोडून दोघांनी अभ्यासाला सुरवात केली. सुरवातीला बंगाळे यांनी यूपीएससीची तर सूळ यांनी स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांची तयारी सुरू केली. २०१६-१७ मध्ये बंगाळे यांची एक्साईज विभागात निरीक्षक म्हणून निवड झाली. बंगाळे यांच्या हाती एक पोस्ट होती. मात्र, सूळ यांच्याकडे काहीच नव्हते.

पुन्हा दोघांनी अभ्यासाला सुरवात करून यूपीएससी ऐवजी राज्यसेवेची तयारी सुरू केली. बंगाळे यांना नंतर परिवहन आधिकारी, उपमुख्यकार्यकारी आधिकारी या पोस्ट मिळत गेल्या. मात्र, सूळ यांच्याकडे एकही पोस्ट नव्हती. या काळात दोघे मित्र एकत्र अभ्यास करीत होते.एकमेकाचा उत्साह वाढवत अभ्यास करीत होते. बंगाळे यांच्या हातात पोस्ट होती. मात्र, सूळ यांचा संघर्ष सलग सात वर्षे सुरू होता. पाच वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली होती. मात्र, या काळात मित्राची साथ कायम होती.२०१९ च्या परीक्षेची तयारी दोघांनी एकत्रित चांगल्या पद्धतीने केली. आधी केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला त्याचे चांगले फळ मिळाले. यावेळी दोघांचीही उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. निवड यादीत बंगाळे १८ वे तर सूळ २२ वे आले.

या दोन्ही मित्रांची कौटुंबिक पाश्‍र्वभूमी जवळपास सारखीच आहे. दोघेही ग्रामीण भागातून आलेले. बंगाळे यांचे वडील शेती करतात तर भाऊ मंडल आधिकारी आहे. सूळ यांचे वडील गावाकडे माध्यमिक शिक्षक आहेत. दोघांची पाश्‍र्वभूमी, केलेला संघर्ष, या काळात एकमेकांनी दिलेली साथ आणि आता मिळालेल्या यशाची चर्चा ‘एमपीएससी’च्या जगात भाव खाऊन गेलीय.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in