Sadabhau Khot Tell about his Past Friendship with Ex MP Raju Shetty | Sarkarnama

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या मैत्रीत बिब्बा घालणारे नक्की कोण?

संपत मोरे
गुरुवार, 30 एप्रिल 2020

"राजू शेट्टी आणि माझी दोस्ती खूप जिव्हाळ्याची होती. पण त्या दोस्तीत काहींनी  बिब्बे घातले. आमच्यात वाद पेटवला. आमची दोस्ती तोडली. मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रहायचे होते. मात्र मला संघटनेतून बाहेर काढले."असे आमदार सदाभाऊ खोत सांगितले.

पुणे : "राजू शेट्टी आणि माझी दोस्ती खूप जिव्हाळ्याची होती. पण त्या दोस्तीत काहींनी  बिब्बे घातले. आमच्यात वाद पेटवला. आमची दोस्ती तोडली. मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रहायचे होते. मात्र मला संघटनेतून बाहेर काढले."असे आमदार सदाभाऊ खोत सांगितले.

सदाभाऊ खोत सध्या त्यांच्या फेसबुक पेजवर चळवळीतील अनुभव लिहीत आहेत.त्यावेळी त्यांना अनेक लोक "तुम्ही आणि राजू शेट्टी पुन्हा एकत्र येणार का?"अस विचारत आहेत. त्याबाबत 'सरकारनामा'ने त्यांची प्रतिक्रिया विचारली.तेव्हा त्यांनी सरकारनामा प्रतिनिधीजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या.

"मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नेता व्हायचे नव्हते. राजू शेट्टी हेच आमचे नेते होते. शरद जोशी यांच्यानंतर महाराष्ट्राला शेतकऱ्यांचा नेता मिळाला पाहिजे म्हणून आम्ही अगदी गडचिरोली चंद्रपूरपर्यत सभा केल्या. आमच्यात कसलेही मतभेद नव्हते. आम्ही जिवाभावाने राहत होतो. एकमेकांची काळजी घ्यायचो. एक दिवस मिटींगमध्ये कार्यकर्त्यांशी माझा वाद झाला. मग मी घरात येऊन झोपलो. रात्री साडेअकराला राजू शेट्टी यांचा फोन आला. त्यांनी विचारलं 'भाऊ तुम्ही जेवला का? 'मग मी त्यांना विचारलं, 'तुम्ही जेवला का? तर तेही जेवले नव्हते. मग त्यांनी मला जेवायला लावलं."अशी आठवण सदाभाऊंनी सांगितली.

"हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लोकसभेला मी उभा रहावे अशी राजू शेट्टी यांची इच्छा होती. आम्ही त्याबाबत गोपीनाथ मुंडे यांना भेटायला गेलो होतो. मुंडे साहेब मला म्हणाले, राजू शेट्टी आमदार आहेत. त्यांचं नाव त्या मतदारसंघात झालं आहे. त्यांची हक्काची मत आहेत. त्यांना लोकसभेला उमेदवार करू द्या. तुम्हाला आमदार करू. नंतर राजू शेट्टी यांनी लोकसभेला उमेदवारी केली. आम्ही सगळ्यांनी जिवाचं रान केलं. प्रस्थापितांच्या विरोधातील लढाई आम्ही जिंकलो." असेही खोत यानी सांगितले.

"मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडायचे नव्हते.पण मला बाहेर काढण्यात आले. राजू शेट्टी आणि आमच्या मैत्रीत काही लोकांनी बिब्बे घातले. आमची दोस्ती तोडली. मला स्वाभिमाचा नेता व्हायचे नव्हते. राजू शेट्टी यांनाच मी नेता मानत होतो."असे खोत म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख