डॉ.विश्‍वजीत कदम-अमित देशमुख;नाते दोन पिढ्यांचे....जिव्हाळा आणि कर्तव्याचे!

कोरोनाविरूद्धच्या लढाईत डॉक्टर आणि परिचारिका आघाडीवर आहेत. या योध्दयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी नुकताच सांगलीचा दौरा केला. या दौऱ्यात मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. कदम तसेच रूग्णालयांतील डॉक्टरांसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी फोनवरून संवाद साधत डॉक्टर व परिचारिका रात्रंदिवस करीत असलेल्या कामाचे कौतुक केले
डॉ.विश्‍वजीत कदम-अमित देशमुख;नाते दोन पिढ्यांचे....जिव्हाळा आणि कर्तव्याचे!
Leaders in Two Generations Vilasrao, Patangrao, Amit Deshmukh and Vishwajeet Kadam

पुणे : कोरोनाविरूद्धच्या लढाईत डॉक्टर आणि परिचारिका आघाडीवर आहेत. या योध्दयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी नुकताच सांगलीचा दौरा केला. या दौऱ्यात मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. कदम तसेच रूग्णालयांतील डॉक्टरांसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी फोनवरून संवाद साधत डॉक्टर व परिचारिका रात्रंदिवस करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.

या संदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना डॉ. कदम म्हणाले, ''पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल ) येथे कोरोनावर उपचार करणाऱ्या कोरोना योद्धा टीमसमवेत चर्चा केली व त्यांचे विशेष अभिनंदन केले. या बिकट परिस्थितीमध्ये ते करीत असलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी कोरोना योद्धा टीमने त्यांच्या काही समस्या सांगितल्या,''

ते पुढे म्हणाले, "राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितजी देशमुख सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये खूप प्रभावी कार्य करीत आहेत. त्यांच्याशी माझे बंधुत्वाचे संबंध आहेत. म्हणूनच सिव्हिल हॉस्पिटलमधून मी थेट अमित यांना फोन लावला. येथील कोरोना योद्धा टीमच्या काही समस्या ऐकून घ्याव्यात व त्यांचे मनोधैर्य वाढवावे, अशी विनंती मी त्यांना केली. विनंती त्वरीत मान्य करीत त्यांनी माझ्या मोबाईल फोनवरील 'स्पीकर ऑन'च्या माध्यमातून कोरोना योद्धा टीमशी संवाद साधला. इतकेच नव्हे तर त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यास संदर्भातील सूचना देखील संबंधित अधिकारी वर्गाला लगेचच दिल्या.''

यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले, ''दिवंगत विलासराव देशमुख आणि दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच अमित आणि माझेही बंधुत्वाचे संबंध आहेत. विशेष म्हणजे, मंत्री, आमदार, नेता याच्याही पलीकडे जाऊन जनतेच्या समस्यांची जाण असलेली संवेदनशील व्यक्ती, असे आमचे काँग्रेसजनांचे नाते असते. ज्या प्रकारे रूग्णालयातील डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला तसेच त्यांच्या अडचणींवर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून त्यांच्यातील संवेदनशील नेत्याचे दर्शन झाले. विलासराव देशमुख यांची ७५ वी जयंती आपण नुकतीच साजरी केली. अमित यांच्या संवेदनशीलतेचा विलासरावांना सार्थ अभिमान वाटला असता तसेच पतंगराव कदम यांचा संस्कारांचा वसा आपण पुढे नेत आहोत. याचाही मला अभिमान वाटला.''

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in