नवरा- नवरीसाठी खास चांदीचे मास्क ; संदीप सांगावकर यांची अभिनव कलाकृती - Special silver mask for wedding, innovative work of art by Sandeep Sangavkar | Politics Marathi News - Sarkarnama

  नवरा- नवरीसाठी खास चांदीचे मास्क ; संदीप सांगावकर यांची अभिनव कलाकृती

नंदिनी नरेवाडी 
शनिवार, 16 मे 2020

मास्क जरूर वापरा, असा जणू संदेश देण्यासाठी संदीप सांगावकर यांनी नवरा-नवरीसाठी प्रतीकात्मक मास्क म्हणून खास चांदीचे मास्क तयार केले आहेत.

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी देशभर लॉकडाउन जाहीर झाले. ऐन लग्नसराईतील लॉकडाउनमुळे लग्ने लांबणीवर पडली. काही दिवसांपूर्वी लॉकडाउन शिथिल केल्यानंतर काही प्रमाणात ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीत शुभविवाह होऊ लागले. अशात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य बनले. घराबाहेर पडणार असाल तर मास्क जरूर वापरा, असा जणू संदेश देण्यासाठी संदीप सांगावकर यांनी नवरा-नवरीसाठी प्रतीकात्मक मास्क म्हणून खास चांदीचे मास्क तयार केले आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क वापरण्याविषयी शासन, वैद्यकीय यंत्रणेतर्फे प्रबोधन मोहीम राबविली जात आहे. रस्त्यावरून मास्क न घालता वावरल्यास त्या व्यक्तीला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. अशा वेळी लग्नसमारंभातून चांदीचा मास्क लावून मास्क वापरण्याविषयी अनोखी जनजागृती संदीप सांगावकर या युवकाने केली आहे.

 

लग्न म्हणजे दागिने मिरवण्याचा समारंभच. परंतु, आता हे दागिने घालूनही पाहायला कोणी नाही अशी स्थिती. त्यातच कोरोनाचे सावट आणखी गडद झालेले. त्यामुळे लग्नातील क्षण अविस्मरणीय करण्यासाठी चांदीचे मास्क नवरा नवरीला घालता येणार आहे. आणि त्या निमित्ताने दागिन्यांची हौसही भागवता येणार आहे.

लॉकडाउनमधील कारागिरी

लॉकडाउन काळात प्रत्येकालाच सक्तीने घरी बसावे लागले. अशा वेळी अनेकांनी विविध छंद जोपासत कलात्मक वस्तू तयार केल्या. संदीप यांनीही व्यवसायाशी संबंधित व सद्यःस्थितीला साजेसे मास्क तयार करण्यास सुरवात केली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करताच त्याला प्रतिसादही चांगला मिळू लागला.

 लॉकडाउन काळात भरपूर वेळ मिळत होता. त्याचा सदुपयोग करण्यासाठी मास्क तयार करावा अशी कल्पना सुचली. 25 ग्रॅम चांदीपासून तयार केलेला मास्क किफायतशीर दरात उपलब्ध होतो.
संदीप सांगावकर  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख