खासदार हिना गावित यांना पंतप्रधान कार्यालयांतून कधीही फोन येऊ शकतो... - MP Heena Gavit name is on top for inclusion in Modi cabinet) | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

खासदार हिना गावित यांना पंतप्रधान कार्यालयांतून कधीही फोन येऊ शकतो...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींनी घेतलाय वेग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रीमंडळाचा विस्तार येत्या तीन-ते चार दिवसांत होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव आघाडीवर असले तरी इतर नावांत नंदुरबारच्या खासदार डाॅ. हिना गावित यांचेही नाव संभाव्य नावांत अग्रक्रमाने घेतले जात आहे. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचेही नाव चर्चेत आहे. पण गावित यांना मंत्रीपदाची लाॅटरी लागू शकते, असे भाजपमधील अनेकांची खात्री आहे. (MP Heena Gavit`s name is on top for inclusion in Modi cabinet)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गावित यांच्या नावाला पसंती दाखवली आहे. आदिवासी महिला खासदार, तरूण आणि शिक्षणाने एबीबीएस अशा बाबी गावित यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. त्या दुसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. त्यांची लोकसभेतील कामगिरीही भाजप नेत्यांच्या नजरेत भरली आहे.  भाजप नवमतदारांना आपलेसे करत आहे. तसेच सर्व समुदायांना, समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळेल, अशा पद्धतीने पदे देताना विचार केला जात आहे. तो विचार केल्यानंतर व्यक्तीची निवड केली जाते. त्यामुळेच विकास महात्मे, भागवत कराड आदींना भाजपने राज्यसभेवर जाणीवपूर्णक स्थान दिले होते. तसेच गावित यांच्याबाबतीत घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाल्यानंतर गावित यांना त्या आधी केव्हाही शपथविधीसाठी फोन येऊ शकतो, अशी शक्यता भाजपच्या गोटात खात्रीने व्यक्त होत आहे.

  

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्यातील त्या प्रवर्गातील समुदायांत खदखद आहे. त्यामुळे ओबीसींमधून प्रीतम मुंडे यांच्या नावाचा विचार होणार असल्याचे सांगण्यात येते. भाजपमधून खासदार झालेले नारायण राणे यांनाही आता केंद्रात संधी मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यांना संधी मिळाली तर भविष्यात भाजप-सेना युती होणार नाही, असे स्पष्ट संकेत जातील. त्यामुळे राणे यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील समावेशावर अनेक बाबी अवलंबून आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नात राणे हे आक्रमकपणे भाजपची बाजू मांडत आहेत. त्यामुळे त्याचाही उपयोग राणेंना होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण केंद्रात जाणार नसल्याचे सांगिल्याने ते महाराष्ट्रातच भाजपचे नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चा थांबल्या आहेत. 

महाराष्ट्रातील या नावांशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनवाल,त्रिवेंद्र सिंह रावत, अनुप्रिया पटेल, सुशील मोदी रिटा बहुगुणा जोशी, जफर इस्लाम यांच्याही नावाची चर्चा आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख