देवेंद्र फडणवीसांचा विक्रम आर्या राजेंद्रन मोडणार! - Aarya Rajendran to Break Devendra Fadanavis Record about Youngest Mayor | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणवीसांचा विक्रम आर्या राजेंद्रन मोडणार!

वृत्तसंस्था
रविवार, 27 डिसेंबर 2020

तिरुवनंतपूरम महानगरपालिकेला लवकरच नवीन महापौर लाभणार असून ती राज्यातीलच नाही तर देशातील तरुण महापौर ठरणार आहे. माकपने २१ वर्षीय आर्या राजेंद्रन यांची महापौरपदासाठी निवड केल्याने हा निर्णय तिरुअनंतपूरमच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. 

तिरुवनंतपूरम : तिरुवनंतपूरम महानगरपालिकेला लवकरच नवीन महापौर लाभणार असून ती राज्यातीलच नाही तर देशातील तरुण महापौर ठरणार आहे. माकपने २१ वर्षीय आर्या राजेंद्रन यांची महापौरपदासाठी निवड केल्याने हा निर्णय तिरुअनंतपूरमच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. 

आर्या राजेंद्रन यांची नियुक्ती करण्याचा निर्णय माकपच्या जिल्हा सचिवालयाने घेतला. अलिकडेच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आर्या राजेंद्रन यामुदवन्मुगल प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. या निवडणुकीत त्यांना माकपकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्या सर्वात तरुण उमेदवार म्हणून ओळखल्या गेल्या. देशातील सर्वात तरुण महापौर असणाऱ्या आर्या सध्या बीएससी (गणित) च्या विद्यार्थिनी आहेत. तिरुवनंतपूरमच्या ऑल सेंटस महाविद्यालयाच्या त्या विद्यार्थिनी आहेत. 

राजकीय आघाडीवर सक्रिय राहणाऱ्या आर्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य समितीच्या सदस्य आहेत. या निर्णयाचा अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राजकारण आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी एकाचवेळी पार पाडू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे महापौरपदाच्या शर्यतीत माकपचे ज्येष्ठ नेते जमीला श्रीधरन यांच्यासह अन्य दोन नेत्यांची नावे चर्चेत होते. मात्र पक्षाने अनुभवाऐवजी युवा नेत्याला स्थान दिले. शंभर सदस्यीय महानगरपालिकेत सत्ताधारी डेमोक्रॅटिक फ्रंटकडे ५२ जागा आहेत तर भाजपकडे २५ जागा आहेत. अर्थात अधिकृतरित्या महापौरपदासाठी उमेदवारी दिल्याचे आर्याला पक्षाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही.

आर्या राजेंद्रन यांच्या अगोदर सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर होता. ते वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे महापौर झाले होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख