मास्कविना पिंपरीच्या भाजप महापौरांचे रॅम्पवॉक

खुद्द पिंपरी-चिंचवडच्या भाजप महापौर माई ढोरे यांनीच काल रात्री (ता.२२) कोरोना निर्बंधांची ऐशीतैशी करीत नाट्यगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणी विनामास्क रॅम्पवॉक केला.
मास्कविना पिंपरीच्या भाजप महापौरांचे रॅम्पवॉक
PCMC Mayor Organised Program without face mask

पुणे : खुद्द पिंपरी-चिंचवडच्या भाजप महापौर माई ढोरे यांनीच काल रात्री (ता.२२) कोरोना निर्बंधांची ऐशीतैशी करीत नाट्यगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणी विनामास्क रॅम्पवॉक केला.

शहराचे कारभारी आणि भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त (ता.१५) त्यांनीच आयोजित केलेल्या या मिस आणि मिसेस पिंपरी-चिंचवड कार्यक्रमातही सोशल डिस्टंसिंगचे बारा वाजल्याचे पहायला मिळाले. यावेळी व्हीआयपींनी सुद्धा मास्क घातला नसल्याचे आढळले.शहरातील कोरोना रुग्णांची दररोजची संख्या गेल्या काही दिवसांत दुप्पट,तिप्पट झाल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणे गरजेचे असताना उलट निष्काळजीपणा दाखवण्यात आलेल्या या प्रकाराची शहरभर चर्चा आहे.

अशा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी दोनशेंच्या उपस्थितीचे बंधन असताना महापौरांच्या या कार्यक्रमाला,मात्र त्यापेक्षा दुप्पट व त्याहून अधिक म्हणजे नाट्यगृह भरून उपस्थिती होती. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे शहरातील दररोजची नव्या रुग्णांची संख्या ही दुप्पट,तिप्पट झाल्याने या कार्यक्रमाच्या २४ तास अगोदरच पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नव्याने कडक निर्बंध जारी केले होते.

त्यानुसार शाळा,कॉलेजस पुन्हा बंद करण्यात आली असून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय,सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध आणण्यात आली असून कोरोनाचे नियम कडक केले गेले आहेत. मात्र,ते २४ तासाच्या आत महापौरांनीच धाब्यावर बसवल्याचे दिसून आले.विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडूके चालविणाऱ्या व सर्वसामान्यांच्या विवाहसोहळ्यांत जास्त गर्दी केली म्हणून गुन्हे दाखल करणारे पोलिस याप्रकरणी गप्प का अशी चर्चा शहरात सुरु आहे.

पालिकेच्या चिंचवड येथील नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेला परिक्षकांसह,सेलिब्रिटी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनीही मास्क न घातल्याचे व सोशल डिस्टसिंगचे पालनही न केल्याचे दिसून आले.याअगोदर दोन दिवस म्हणजे वीस तारखेलाही पिंपळे गुरवला पालिकेच्या दुसऱ्या नाट्यगृहात असेच घडले होते. तेथेही महापौरांची उपस्थिती होती. भाऊंच्या वाढदिवसाचाच तो कार्यक्रम होता. तेथेही सेलिब्रिटींसह पदाधिकारी व अनेकांनी मास्क न घालता सोशल डिस्टसिंगचे बारा वाजवले होते.

मुळात कारभाऱ्यांच्या वाढदिवसाची सुरवातच अशा शेकडोंच्या उपस्थितीने हॅपी नाईट सोहळ्याने पिंपळे गुरवला १४ तारखेला झाली होती. शहीद दिनी तो झाल्याने सोशल मिडियातून त्यावर टीका झाली होती. भाऊंचा वाढदिवस गेले आठवडाभर शहरात दणक्यात साजरा झाला. कालही, त्यानिमित्त त्यांच्या मतदारसंघात असे दोन कार्यक्रम झाले. दोन्ही ठिकाणी दोनशेपेक्षा अधिक उपस्थिती होती. त्यावेळी मास्क अनेकांनी घातले नव्हते. त्यामुळे बंधनकारक असलेला सॅनिटायझरचा वापर हे,तर दूरच राहिले. दुसरीकडे शहराचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी,मात्र आपला यावर्षीचा आपला वाढदिवस (ता.१६) साजरा न करता त्यादिवशी कोरोना योद्ध्यांचा गौरव केला होता.

दरम्यान, आपण नेहमीच मास्क वापरतो,असे महापौर म्हणाल्या.तसेच आपल्या कार्यक्रमाला परवानगी घेतली होती आणि त्याला दोनशेपेक्षा कमीच लोक उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला. पण, सौदर्य स्पर्धा असल्याने त्यासाठी नटूनथटून आल्याने काही महिलांनी मास्क घातला नव्हता,असे त्या म्हणाल्या.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in