पिंपरी चिंचवड उपमहापौर निवडणूक; राष्ट्रवादीची नगरसेविकेला उमेदवारी?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे बहूमत आहे.त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता.६) होणाऱ्या उपमहापौर निवडणुकीत त्यांचाच उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट आहे. तरीही विरोधी पक्ष राष्ट्रवादी आपला उमेदवार या पदासाठी देणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
PCMC
PCMC

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे बहूमत आहे.त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता.६) होणाऱ्या उपमहापौर निवडणुकीत त्यांचाच उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट आहे. तरीही विरोधी पक्ष राष्ट्रवादी आपला उमेदवार या पदासाठी देणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

दरम्यान, भाजपचा उमेदवार ठरला असून राष्ट्रवादीचा मात्र ऐनवेळी अजितदादा सांगतील तो उमेदवार असणार आहे.यावेळी महिला नगरसेविकेला ही संधी देण्याचा पक्षाचा विचार असून निकिता पवार यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे. दरम्यान, चार दिवसांनी होणाऱ्या या निवडणुकीचे चित्र आज सायंकाळी पाच वाजताच स्पष्ट होणार आहे.

आज या पदाच्या निवडणुकीसाठी दुपारी तीन ते सायंकाळी पाच अशी अर्ज दाखल करण्याची वेळ व मुदत आहे.भाजपने केशव घोळवे या नगरसेवक व कामगार नेते असलेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी निश्चीत केली आहे.तर, आमचा उमेदवार अर्ज दाखल करतेवेळी कळेल, असे पाालिकेचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांनी सांगताना ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केले. 

गतवेळी त्यांनी या पदाच्या निवडणुकीसाठी नगरसेवकाला संधी दिली होती. यावेळी,मात्र नगरसेविकेला ही उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते. तसेच भाजपचा उमेदवार ज्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहे, तेथीलच राष्ट्रवादीच्या या नगरसेविकेला उमेदवारी देऊन ही निवडणूक रंगतदार करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी प्रथमच निवडून आलेले जुने भाजपचे कार्यकर्ते केशव घोळवे यांचे नाव निश्चीत झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक असलेल्या घोळवेंचे नाव सूचवून धूर्त खेळी केली आहे. यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शहर कारभाऱ्यांच्या समर्थकांचा हिरमोड झाला आहे.

उपमहापौरपदासाठी येत्या शुक्रवारी (ता.६) निवडणूक होणार आहे. भाजपचे पालिकेतील बहूमत पाहता त्यांचाच उपमहापौर होणार हे स्पष्ट आहे. फक्त तो भोसरीचा होणार अशी चर्चा होती. या पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. त्यासाठी चंद्रकांतदादांनी शहराचे कारभारी व पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप (चिंचवड) आणि महेश लांडगे (भोसरी) यांच्याशी चर्चा करून घोळवे यांचे नाव निश्चीत केले.

घोळवे हे मावळते उपमहापौर तुषार हिंगे यांच्याप्रमाणेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. तर, महापौर माई ढोरे या लक्ष्मणभाऊंच्या मतदारसंघातील असून त्यांच्या पाठीराख्या आहेत. तर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे हे महेशदादांचे  समर्थक आहेत. तर, आता उपमहापौरपदासाठी जुन्या एकनिष्ठ भाजपा कार्यकर्त्याला संधी दिल्याने तीन महत्वाच्या पदांचे वाटप शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात समसमान झाले आहे.
Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com