अमरावती : महाविकास आघाडी सरकार मध्ये औरंगाबादच्या नामकरणा वरून पुन्हा मतभेद समोर आल्याने महाविकास आघाडी सरकार मधील वाद उफाळून आला आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे बोलतांना त्यांनी आघाडीवर टीका केली.
घरात जसं जावा आणि नणंद यांचे भांडण असते तसे त्यांचे आहे. जबरदस्तीने सरकार मध्ये राहणं आणि विचार न पटणे अशी अवस्था त्यांची झाली आहे. जर तर विचार जमतं नसतील तर त्यांनी एकमेकांना सोडलं पाहिजे व आपापल्या पद्धतीने काम केलं पाहिजे असेही खासदार राणा म्हणाल्या. तुमचे दुकान आधी बंद होते ते आता उघडले आहे, हे लोकांना दिसते आहे, असाही टोला त्यांनी शिवसेनेला उद्देशून लगावला. विचार जुळत नसतानाही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांबरोबर रहात आहेत. त्यामुळे त्यांनी एकमेकांपासून बाजूला व्हावे, असा सल्लाही नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला दिला.
दरम्यान, "केंद्रात आणि राज्यात तुमचे पाच वर्षे सरकार होते. तुम्ही अहलाबादचे प्रयागराज केले, तर फैजाबादचे अयोध्या असे नामकरण केले. त्याचवेळी तुम्हाला औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करता आले असते, मग तुम्ही ते का नाही केले?'' असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला विचारला आहे.
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस पक्षाचा नाव बदलण्यास विरोध असल्याचे सांगितले होते. तसेच, एमआयएम या पक्षानेही तीव्र विरोध दर्शविली आहे. त्याबाबत भारतीय जनता पक्षाने शिवसेना याबाबत काय करणार? असे म्हटले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

