दोन वर्षांत भिंत नाही बांधलीत; २५ वर्षांचे काय सांगता - सुप्रिया सुळेंचे महापौरांना प्रत्युत्तर - MP Supriya Sule Answers Mayor Murlidhar Mohol Allegations | Politics Marathi News - Sarkarnama

दोन वर्षांत भिंत नाही बांधलीत; २५ वर्षांचे काय सांगता - सुप्रिया सुळेंचे महापौरांना प्रत्युत्तर

सागर आव्हाड
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

कात्रज परिसरात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्याला महापौर मोहोळ यांनी उत्तर दिले. त्यावर आता सौ. सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

पुणे : ''पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षात पूर पूरस्थिती निर्माण होतेय आणि त्यामुळे याला आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात तथ्य नाही. सुरक्षा भिंत दोन वर्षांपूर्वी पडली आणि अजूनही त्याच काम पूर्ण झालं नाही तर यामध्ये २५ वर्षाचा हिशोब कसा होऊ शकतो,'' असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना उद्देशून विचारला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पूरस्थिती उद्भवलेल्या ज्या भागाचा उल्लेख केला आहे, त्याच भागातून त्यांच्याच पक्षाचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आले होते. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामासाठी नेला. त्यांनी दूरदृष्टी ठेवली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, अशी टीका मोहोळ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली होती. त्याला सौ. सुळे यांनी उत्तर दिले. टीका करावी पण काम ही करावे , असाही सल्ला त्यांनी महापौरांना दिला. अतिवृष्टीग्रस्ताच्या केंद्रीय मदतीसाठी पंतप्रधानाकडे प्रयत्न करणार आहोत. पुण्यातील पुरास कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढयाची वर्क ऑर्डर दोन दिवसात काढून लवकरच हा विषय मार्गी लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

मुसळधार पावसामुळे पुण्यात अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली . खासदार सुप्रिया सुळे यांनी या पूरस्थितीचा आढावा घेऊन पाहणी केली. कात्रज परिसरात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला होता. त्याला महापौर मोहोळ यांनी उत्तर दिले. त्यावर आता सौ. सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

"कमी वेळात जादा पाऊस पडतो आहे. परवा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला या पावसाने झोडपले. पुण्यात काही वेगळे झाले असे म्हणता येत नाही. परंतु, खासदार सुप्रियाताई सुळेंनी असे आरोप केले की याला महापालिका व सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे. पण मला असे वाटते की ताईंना हे माहिती आहे की गेली अनेक वर्षे पुणे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता होती. त्यामुळे तीन वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या काळातच हे घडले असे म्हणता येणार नाही,'' असेही मोहोळ म्हणाले आहेत.

चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या भागात कृषी विधेयक साठी रॅली काढली त्याच भागात त्याच्या विचाराचा साखर कारखाना बंद आहे. पवार कुटूंबियावर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाही,कोणीही यावे आणि मनमोकळं करावं आम्ही दिलदार आहोत,'' असा टोला सौ. सुळे यांनी भाजप नेत्यांना लगावला. एकनाथ खडसे प्रवेशाबाबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा, असे उत्तर त्यांनी दिले. 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख