करुणा मुंडेंचा मुक्काम आणखी काही दिवस तुरुंगातच... मुंबईतील घरीही पोलिसांचे छापे
Karuna Munde

करुणा मुंडेंचा मुक्काम आणखी काही दिवस तुरुंगातच... मुंबईतील घरीही पोलिसांचे छापे

बीडचे पोलिस सध्या अॅक्टिव्ह मोडवर

बीड/मुंबई : करुणा मुंडे-शर्मा (Karuna Munde) यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून त्यांनी बीड न्यायालयात (Beed Court) जामिनासाठी अर्ज केला असला तरी त्यावर 14 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आणखी सहा दिवस त्यांना तुरुंगात राहावे लागणार आहे. परळीत येणे त्यांना चांगलेच भोवले असून पाच सप्टेंबर पासून त्या पोलिस कोठडी किंवा तुरुंगात आहेत. 

त्यांच्यावर परळी पोलिसांनी अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडे पिस्तूल आढळल्याचा उल्लेख गुन्हा दाखल करताना करण्यात आला होता. या गुन्ह्यांसाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी बीड तुरुंगात हलविण्यात आले. त्यांना वकिलही मिळू शकला नाही. त्यांनी स्वतःच न्यायालयात आपली बाजू मांडली. 

न्यायालयात जामीन अर्ज करण्यासाठी काल त्यांना वकिल मिळाला. त्यानुसार आज अर्ज दाखल झाला. त्यावर आता 14 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

दुसरीकडे दाखल झालेल्य गुन्ह्याचा तपास करण्यासाठी बीड पोलिसांचे पथक आज मुंबईत दाखल झाले. बीडचे पोलिस आधी सकाळी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गेले. नंतर मुंबई पोलिसांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे. करुणा शर्मा यांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. करुणा शर्मा परळीत गेल्या असताना त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडले होते त्याप्रकरणी गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल आहे. या संदर्भात पोलिसांनी माहिती घेतली.

घटनाक्रम असा घडला.. 

करुणा शर्मा व दत्तात्रय मोरे या दोघांवर अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला. यावरुन परळी पोलिसांनी दोघांना अटक केली. सोमवारी अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. स. सापतनेकर यांच्यासमोर शर्मा व मोरे यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. सोमवारचा त्यांचा मुक्काम कारागृहातच झाला असून मंगळवारही त्यांना कारागृहातच घालवावी लागली. इतर पाच महिला कच्चे कैदी व करुणा शर्मा असे सहा महिला कच्चे कैदी कारागृहात आहेत. त्यांना भेटण्यासाठी दोन दिवसांत कोणीही आले नसल्याचे सूत्रांनी सांगीतले. वास्तविक कोरोनामुळे कारागृहातील भेटीही बंद आहेत. तर एक दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी अरुण मोरे यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यालाही न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in