सपशेल अपयशी ठरलेल्या नेतृत्वाचा पर्दाफाश करणार : पंकजा यांचा रोख कोणाकडे...

राज्यभर लवकरच दौरा करणार असल्याचे केले जाहीर...
Pankaja Munde
Pankaja Munde

परळी : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून अपयशी ठरलेल्या नेतृत्वाचा पर्दाफाश करणार असल्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला. (I will unmask unsuccessful leaders warns Pankaja Munde) मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनात झालेले हाल यावर नेतृत्व अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता गावोगावी जाऊन अशा नेत्यांचा पर्दाफाश करावा लागणार आहे. गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श समोर ठेवून हा लढा आता मी सुरू करणार आहे, असे इशारा त्यांनी दिला. (Gopinath Munde death anniversary)

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी भगवान गडावरून आॅनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. कोरोनाच्या संकटाचे सावट दूर झाल्यानंतर मी लवकरच राज्याचा दौरा करणार आहे. आपल्याला शिवाजी पार्क भरून दाखवायचे आहे. पण त्या आधी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे मार्गी लागली पाहिजेत. आम्हाला न्याय कधी मिळणार हे सांगा. खरी तारीख सांगा. लोक ते मान्य करतील. येथील जनता जातियवादी नाही. नेते हे जातियवादी असतात. लोकांना दिलासा देण्याचे काम नेत्यांनी करायला हवे. मी मुख्यमंत्र्यांना भेटून सारे प्रश्न मांडणार आहे. माझ्या सूचना त्यांच्या कानी घालणार आहे. हे प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगणार आहे. 

कोरोनाच्या परिस्थितीत लोकांचे किती हाल झाले, हे सांगत त्या म्हणाल्या की लशीसाठी अनेकांना रांगा लावाव्या लागल्या. लसीकरणाचे धोरण नीट नव्हते. या साऱ्या परिस्थितीत लोकांना दिलासा देण्याचे काम सुरू करावे लागणार आहे. मी वीस दिवस एकांतात घालवले. त्यातून गावागावात, जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन लोकांमध्ये जागृती करायची आहे. ओबीसींना न्याय आणि मराठ्यांना दिशा देण्यासाठी आता लढायचे आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे हतबल झालेल्यांच्या पाठीवर हात फिरवायचा आहे. मला शिवाजी पार्क राजकीय हेतुसाठी किंवा निवडणुकीसाठी भरवायचे नाही. समाजाच्या वंचितांना दाखवलेले हे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातील पराभवाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की पराभव हा अल्पविराम आहे. लोकांच्या आशाआकांक्षा संपतील तो खरा पराभव आहे. त्यामुळे या पराभवामुळे मी खचलेले नाही. मात्र आता विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे लढायचे आहे. विरोधी पक्ष म्हणून वज्रमूठ बांधायची आहे. तीन विचारसरणी असलेल्या पक्षांचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे सामान्य जनतेची ओढाताण होते आहे. या जनतेला मला आधार द्यायचा आहे. 

टपाल खात्याने गोपीनाथ मुंडे यांच्यावर टपाल पाकिट काढले आहे. या टपालाद्वारे आपल्या विविध समस्या पंतप्रधान कार्यालयाला पाठवा. पंतप्रधान कार्यालयात मुंडेंचे तिकिट असेलल्या पाकिटांचा खप पडला पाहिजे. म्हणजे पुढच्याा `मन की बात`मध्ये पंतप्रधानांनी त्याचा उल्लेख करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in