चिपळूणच्या नगराध्यक्षांनी घेतली महिला आयोगाकडे धाव - Chiplun Women City president Complaints to women commission | Politics Marathi News - Sarkarnama

चिपळूणच्या नगराध्यक्षांनी घेतली महिला आयोगाकडे धाव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याअगोदरच त्यांची बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष अशिष खातू यांनी दिली. 

चिपळूण : महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याअगोदरच त्यांची बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष अशिष खातू यांनी दिली. 

महाविकास आघाडी व भाजप नगरसेवकांमध्ये काही दिवस दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप करत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या अर्जावर उद्या (ता. २१) जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.  तत्पूर्वी भाजपा नगरसेवक व चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू यांनी महाविकास आघाडी नगरसेवकांविरोधात आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

यावेळी ते  म्हणाले, "महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.  तसेच बडतर्फ करण्यासाठी दाखल केलेला अर्जही चुकीचा व अर्धवट माहितीच्या आधारे करण्यात आला आहे. २५ पंचवीस वर्षात मागील सत्ताधार्‍यांना चिपळूण शहराचा विकास करता आला नाही.  महिला नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी केवळ चार वर्षात चिपळूण शहराचा विकास साधण्यात यश मिळवले आहे. अनेक वर्षापासून रखडलेला मच्छी व मटण मार्केट, भाजी मंडई, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येत्या वर्षभरातच पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत येतील. यामुळेच विरोधकांच्यात पोटशूळ निर्माण झाला आहे. मात्र आम्ही चिपळूण शहराच्या विकासाला प्राधान्य देत आहोत, त्यामुळेच विरोधकांकडून आरोप सुरू झाले आहेत,''

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आमच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. तत्पूर्वी नगराध्यक्षांवरील कोणताही आरोप सिद्ध होण्याअगोदरच त्यांची बदनामी करण्याबरोबरच मानसिक छळ केल्यामुळे त्या अस्वस्थ आहेत. त्यांनी महिला आयोगाकडे धाव घेतल्याची माहिती खातू यांनी दिली. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख