जमिनीशी नातं आणि समाजाशी नाळ तुटू न देणाऱ्या सुप्रियाताई! - NCP MP Supriya Sule Birthday Today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

जमिनीशी नातं आणि समाजाशी नाळ तुटू न देणाऱ्या सुप्रियाताई!

मिलिंद संगई
मंगळवार, 30 जून 2020

काही व्यक्तिमत्वांचा प्रभावच असा असतो की त्यांच्या सहवासात आल्यानंतर माणस आपोआपच बदलतात. मोठे असूनही अंगी साधेपणा बाणवण खूप अवघड असत, पण या साधेपणातच वेगळेपण असत आणि ते लोकांच्या हृदयाला जाऊन भिडतं....समाजकारण करताना कितीही मोठं झालो तरी जमिनीशी नातं आणि समाजाशी असलेली नाळ तुटू न देण्याच काम खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. 

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीकडे वळून पाहताना त्यांनी आजचे स्थान प्राप्त करण्यासाठी जे अपार कष्ट केले आहेत, त्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शरद पवार यांच्या मुलीने मनात आणलं असत तर त्या काहीही होऊ शकल्या असत्या, इतकी जबरदस्त राजकीय ताकद त्यांच्याकडे होती. मात्र तरीही समाजकारणापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला. 

महिला सक्षमीकरणासह उपेक्षित घटकांसाठी काम करत त्यांनी राज्य पिंजून काढले. प्रत्येक भूभागाचे वैशिष्टय तेथील रुढी परंपरा, लोकांचे राहणीमान, त्यांच्या गरजा, उपलब्ध सोयीसुविधा यांचा अभ्यास त्यांनी बारकाईने केला. या काळात समाजातील अनेक विचारवंत, सामाजिक व चळवळीतील कार्यकर्त्यांसह नेते, शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांसोबत विचारविनिमय सुरुच ठेवला.

समाजमन जाणून घेण्याचा प्रयत्न

एका रात्रीत एखाद्या पदावर जाऊन बसण्यापेक्षा अगोदर अनुभव घ्यावा, समाजमन जाणून घ्यावं हा त्या मागचा त्यांचा प्रयत्न होता. 
पवार कुटुंबाची लेक असली तरी समाजकारण लोकांत मिसळून ताई शिकल्या. साधेपणाची राहणी हे त्यांचे वैशिष्टय. साधी साडी, गळ्यात काळी पोत, हातात घड्याळ आणि बांगडी...हा त्यांचा पेहराव...उंची गॉगल घालून फिरलेले त्यांना कधी पाहिल नाही.

प्रश्न समजून घेण्याची हातोटी

सहजतेने लोकांच्या मिसळणं हा त्यांच्या आवडीचा विषय...विद्यार्थी असो वा महिला त्यांच्यात मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.  आज राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांची सोडवणूक करायची असेल व दिल्लीतील काही कामे मार्गी लावायची असतील तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते सुप्रिया सुळे यांचेच. प्रशासकीय अधिकारी, राज्यमंत्री, मंत्री, खासदार यांच्यासह दिल्लीत कोणतेही काम चुटकीसरशी सोडविण्याची ताकद असलेल्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे आज राज्यातील लोक पाहतात.

राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्यासाठी सुप्रिया सुळे याच मराठी माणसांचे एक प्रभावी माध्यम बनलेल्या आहेत ही बाब अभिमानास्पद आहे.  परदेशातील काही काम असो वा पासपोर्ट किंवा व्हिसाशी संबंधित असो सुप्रियाताई हे काम प्राधान्याने करणार या विश्वासावर राज्यभरातून लोक दिल्लीत त्यांच्याकडे कामे घेऊन येत असतात. 

वशिल्याच्या जीवावर राजकारण करण्याचा स्वभाव नाही

प्रभावी राजकीय कुटुंबातून येऊनही वशील्याच्या जिवावर राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीमध्येही त्यांनी मते मागताना आपले गेल्या पाच वर्षांचे प्रगतीपुस्तक मतदारांसमोर ठेवले होते. मी निवडणूकीच्या परिक्षेला उतरले आहे ते मतदारांकडून गेल्या पाच वर्षात कामाच्या माध्यमातून जे काही केल ते पाहूनच मला मते द्या, असे आवाहन त्या करत होत्या. मतदारांनीही कार्यक्षमता व त्यांचा लोकसभेतील उत्तम सहभाग यांचा विचार करुनच त्यांना विजयी केले. 

सर्वपक्षीय नेत्यांशी स्नेह

कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार घेऊन काम करत असले तरी वैयक्तिक संबंध उत्तम असले पाहिजेत, यावर पवारसाहेबांप्रमाणेच सुप्रिया सुळे यांचाही विश्वास आहे, त्या मुळे सर्वपक्षीय नेते त्यांचे स्नेहीजन आहेत. राजकारण हे मैत्रीत आणायचे नाही हा शिरस्ता त्यांनी पाळलेला असल्याने कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी बारामतीची सुप्रियाताईंची कोणतीच कामे दिल्ली दरबारी अडत नाहीत, हे वेगळेपण आहे.

प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, लालुप्रसाद यादवांपासून ते ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, राहुल गांधी, मायावती, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव या सारखी असंख्य दिग्गजांची नावे घेता येतील ज्यांच्याशी ताईंचे अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत. ताई एखादे काम घेऊन आल्या आहेत याचा अर्थ ते तितके महत्वाचे असणार असा सर्वच नेत्यांचा विश्वास असल्याने त्यांची कामेही वेगाने मार्गी लागतात. 

बारामती लोकसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे आव्हान त्यांनी स्विकारले असून अॅनिमिया, क्षयरोग तसेच मलेरियामुक्त मतदारसंघ करायचा त्यांचा प्रयत्न आहे. आगामी काळात देशातील आदर्श असा मतदारसंघ व्हावा या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. राजकारणापलिकडे जात सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन अधिक सुखी व आरामदायी कसे होईल याचा प्रयत्न सुप्रियाताई सातत्याने करीत असतात.

सातत्याने नवे शिकण्याची ओढ

मुलभूत गरजांची पूर्तता होण्यासोबतच मुलींना शिक्षण मिळायला हवं व कुटुंब सुखी समाधानी कसे होईल याचा त्यांचा प्रयत्न असतो. सातत्याने नवीन काहीतरी शिकत राहण्याची ओढ त्यांच्याकडे असल्याने त्या विद्यार्थ्यांच्याच भूमिकेत कायम दिसतात. 

गेल्या एक तपाहून अधिकच्या राजकीय प्रवासात सुप्रिया सुळे यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, खडतर प्रसंग त्यांच्याही जीवनात आले, पण त्यांनी जिद्द व चिकाटी काही सोडली नाही, समाजासाठी सतत काहीतरी करत राहण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे अभीष्टचिंतन करताना त्यांनी हाती घेतलेल्या समाजकारणाच्या या व्रताची पूर्तता होवो हीच त्यांना सदिच्छा...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख