संजय राठोडांवर गुन्हा दाखल करा : स्वरदा बापट यांचा पोलिसांकडे अर्ज - file FIR against Snajay Rathod demands Swarda Bapat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

संजय राठोडांवर गुन्हा दाखल करा : स्वरदा बापट यांचा पोलिसांकडे अर्ज

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

भाजपची या प्रकरणी आता आक्रमक भूमिका 

पुणे : पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी कोणाची तक्रार नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतल्यानंतर या प्रकरणात खासदार गिरीश बापट यांंच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी थेट वानवडी पोलिसांकडे अर्ज देऊन वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. 

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याबाबत आजच पुण्यात येऊन पुणे पोलिसांवर तोफ डागली. त्यानंतर पुण्यातील पदाधिकारीही जागे झाले आणि त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरवात केली.  पूजा चव्हाण हिचा मृत्यू पुण्यात झाला आणि त्याबाबत संशय व्यक्त होत असतानाच पुण्यातील भाजपचे पदाधिकारी मात्र यावर अधिकृतरित्या चकार शब्द काढत नव्हते. आज बापट यांनी तक्रार देऊन या प्रकरणात लक्ष घातले.  

पूजा चव्हाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाकडून गुरुवारी सकाळी वानवडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर स्वरदा बापट यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला.पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जानुसार, 7 फेब्रुवारीला पुजा चव्हाणची आत्महत्या झाल्यनंतर याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात मंत्री संजय राठोड व मृत पूजाच्या नावाच्या संभाषणाच्या 12 ऑडीओ क्‍लीप व्हायरल झाल्या होत्या. ऑडीओ क्‍लिपनुसार मंत्री राठोड यांनी पुजा चव्हाणच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचे आदेश अरुण राठोड नावाच्या युवकाला दिले. ऑडीओ क्‍लीपवरून राठोड यांचे पुजाशी संबंध होते. सतच्या मानसिक त्रासाला कंटाळून, प्रेमभंग, किंवा त्याच्याकडून दबावाला व छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. यानुसार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करणे यासाठी भारतीय दंड संहिता कलम 306 आणि 107 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना त्यांना अटक करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

फडणवीस काय म्हणाले?

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना वाचवले जात आहे का या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत प्रतिक्रिया दिली. ते  म्हणाले की  कायद्याचे राज्य महाराष्ट्रात आहेच कुठे? सरकारमध्ये कुणीही एकमेकांवर नाराज नाही. सर्वांच्या आशिर्वादाने मिलीजुली सरकार सुरू आहे. सत्तेचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी मान्य केली जात नाही. पोलिस ही काही खाजगी मालमत्ता आहे का? ते जनतेसाठीच आहेत ना? राज्यात पोलिस पूर्णपणे दबावात आहेत, असाही आरोप त्यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख