निष्ठावंत उमा खापरे यांच्याकडे भाजपच्या महिला मोर्चाची जबाबदारी

पुण्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
निष्ठावंत उमा खापरे यांच्याकडे भाजपच्या महिला मोर्चाची जबाबदारी
uma-khapare-ff

पुणे : भारतीय जनता पक्षाची जम्बो प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली असून,  त्यात पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, शहर सरचिटणीस गणेश बिडकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गिरीश बापट, माजी आमदार योगेश टिळेकर आदींचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडच्या उमा खापरे यांच्यावर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून भाजपच्या निष्ठावंतांना आवर्जून स्थान देण्यात आले आहे. उमा खापरे या पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक वर्षे काम करीत आहेत. भाजपच्या शहराध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पक्षाने त्यांच्यावर आता प्रदेशची जबाबदारी दिली आहे. 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या या नव्या टीममध्ये बारा उपाध्यक्ष, पाच महामंत्री आणि पाच मंत्र्यांसह प्रदेश कार्यसमिती, निमंत्रित सदस्य, विविध मोर्चाच्या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीत माजी आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे 'ओबीसी मोर्चा' चे अध्यक्षपद कायम ठेवण्यात आले आहे. तर विधान परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी,  गणेश बिडकर,  बाबा मिसाळ यांचा कार्यकारणीत नव्याने समावेश करण्यात आला आहे.

माजी खासदार प्रदीप रावत यांच्याकडे सहसंयोजक पद सोपवण्यात आले आहे . नारायण अंकुशे यांच्याकडे माजी सैनिक विभागाची तर गणेश ताठे यांच्याकडे कामगार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रदेश कार्यकारणी मध्ये सदस्य म्हणून प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले योगेश गोगावले, श्वेता शालिनी,  मेधा कुलकर्णी, माजी मंत्री बाळा भेगडे, गणेश बिडकर यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेश कार्य समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बाळासाहेब गावडे , भाजपाचे शहर सरचिटणीस दीपक ऊर्फ बाबा मिसाळ, शेखर मुंदडा आणि आणि विकास रासकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश कार्य समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे खासदार गिरीश बापट, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अमर साबळे यांना स्थान देण्यात आले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in