BJP Leader Manda Mhatre Alleges Corruption in Navi Mumbai Corporation | Sarkarnama

नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये भ्रष्टाचाराचा मंदा म्हात्रेंचा आरोप

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक विभागामधील शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कंत्राट, आरोग्य विभागातील यंत्रणेचे कंत्राट या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

नवी मुंबई : टाळेबंदीचा फायदा घेऊन महापालिकेच्या उद्यान, शिक्षण आणि आरोग्य विभागांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गौप्यस्फोट बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. स्थानिक ठेकेदारांना डावलून एकाच कंत्राटदारामार्फत महापालिका सर्व प्रकारची कामे करून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व विभागांतील कंत्राटदारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

मंदा म्हात्रे यांनी बांगर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार गेल्या २२ वर्षांपासून उद्यानाचे संरक्षण व संवर्धनाचे काम कोणतीही दरवाढ न करता अविरत करत आहेत. उद्यानातील कामे, माळी कर्मचाऱ्यांचे वेतन, तसेच इतर गोष्टींचा भरणा करून पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना बिले अदा करण्यात आलेली नाही; तरीही पालिकेने नवी मुंबई क्षेत्रातील उद्यान विभागाची सर्व कामे ही मुंबईतील मे. एन. के. शाह इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌स या एकाच ठेकेदाराला दिली आहेत, असा आरोप त्यांनी चर्चेदरम्यान केला आहे.

महापालिकेच्या कारभारामुळे स्थानिक कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक ठेकेदार जीएसटी लागू झाल्यापासून स्वखर्चातून तो भरत आहे. उद्यानातील अगोदर करून घेतलेल्या कामांचे कार्यादेश आणि देयके दिलेली नाहीत. १ मे ते १६ मे या कालावधीतील संवर्धनाची कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी केली असतानाही त्यांचे बिल नवीन ठेकेदारास अदा करण्यात आले आहे, असे आवर्जून म्हात्रे यांनी नमूद केले.

नवी मुंबईबाहेरील ठेकेदाराबाबत साशंकता
महापालिकेने मे. एन. के. शहा इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌स यांना हे काम वार्षिक २४ कोटी ८० लाख रुपयांना दिले आहे; मात्र स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार हे काम ११ कोटी ३० लाख रुपयांमध्ये करून देण्यास तयार असतानाही पालिका त्यांना काम का देत नाही, असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला. नवी मुंबईतील झोन १ व झोन २ मधील सर्व कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना डावलून नवी मुंबईबाहेरील एकाच ठेकेदाराला कसे देण्यात आले, यामागे काही आर्थिक देवाणघेवाण आहे का? किंवा यामागे राजकीय दबाव आहे का? असे प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केले.

सखोल चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक विभागामधील शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कंत्राट, आरोग्य विभागातील यंत्रणेचे कंत्राट या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख