आमदार मंजुळा गावित यांच्या विषयी व्हाॅट्सअॅप वर अपशब्द; साक्री तालुक्यात संतापाची लाट - Teacher used Bad words against Sakri MLA Manjula Gavit | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

आमदार मंजुळा गावित यांच्या विषयी व्हाॅट्सअॅप वर अपशब्द; साक्री तालुक्यात संतापाची लाट

धनंजय सोनवणे
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

आमदार मंजुळा गावित यांच्या विषयी जगदीश अकलाडे या शिक्षकाने अपशब्द वापरल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली असून, आमदार गावित समर्थकांसह शिवसेना पदाधिकाऱ्याच्या आवाहनानंतर आज तालुक्यात बंद पाळण्यात आला आहे.

साक्री : "पांझरा कान बचाव समिती" नामक एका व्हाट्सअप ग्रुप वर तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांच्या विषयी जगदीश अकलाडे या शिक्षकाने अपशब्द वापरल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली असून, आमदार गावित समर्थकांसह शिवसेना पदाधिकाऱ्याच्या आवाहनानंतर आज तालुक्यात बंद पाळण्यात आला आहे. तालुक्यात तणावपूर्ण शांतता असली तरी या प्रकरणामुळे राजकारण मात्र पुन्हा एकदा ढवळून निघत आहे.

तालुक्यातील एक महत्त्वाचा सहकारी प्रकल्प असणारा पांझरा कान सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. या कारखान्या संदर्भातच गेल्या आठवडाभरापासून विविध चर्चा सुरू आहेत. विशेषत: राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कारखाना सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्याची विनंती त्यांना केल्यानंतर कारखान्याचा विषय पुन्हा तालुक्यात ऐरणीवर आला आहे.

अशातच 'पांझरा कान बचाव समिती"  नावानेच असणाऱ्या एका व्हाट्सअप ग्रुप वर कारखान्याच्या अनुषंगाने साधक-बाधक चर्चा दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास होत होती. या चर्चे दरम्यानच ग्रुपमधील सदस्य असणाऱ्या जगदीश अकलाडे या शिक्षकाने तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांना उद्देशून एक अपमानजनक पोस्ट सदर ग्रुप वर टाकली. सदर पोस्ट मधील शब्द हे अत्यंत आक्षेपार्ह असल्याने ग्रुपच्या सर्व सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, याबाबतची माहिती अन्य सर्वत्र सुरू होताच आमदार गावित समर्थकांकडून याबाबत निषेध व्यक्त होऊ लागला. यातच काल थेट पोलिस ठाणे गाठत संबंधित शिक्षकास तातडीने अटक करून कारवाईची मागणी करण्यात आली, तसेच संबंधितांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आमदार मंजुळा गावित समर्थक, शिवसेना पदाधिकारी तसेच आदिवासी संघटनांकडून आज शहरासह तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या बंदला काही ठिकाणी उस्फुर्त तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला असून यावरून देखील राजकारण ढवळून निघाले आहे. अनेकांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे तर काही जणांनी यास विरोध देखील केला आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे मात्र तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख