शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकडे नरेंद्र मोदींची वाटचाल - PM Narendra modi towards Double the Farmers income. BJP Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकडे नरेंद्र मोदींची वाटचाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टप्राप्तीच्या दिशेने केंद्र शासन वाटचाल करत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पीकखर्चाच्या दीडपट किमान हमी भाव देण्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने कायम ठेवली आहे.

नाशिक : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टप्राप्तीच्या दिशेने केंद्र शासन वाटचाल करत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पीकखर्चाच्या दीडपट किमान हमी भाव देण्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा, प्रवक्त्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केले. 

केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, सरकारने कृषिक्षेत्र सुधारणा आणि शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांचे कल्याण या सरकारचा मूलमंत्र आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. कडूलिंबाचे आवरण असलेले युरिया, मृदा आरोग्य कार्ड, पीक विमा योजना, पंतप्रधान सिंचन योजना, शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत, पीक खर्चाच्या तुलनेत पन्नास टक्के अधिक रक्कम असलेला किमान हमीभाव, दुग्धव्यवसाय- मधुमक्षिका पालन अशा संधी उपलब्ध करत कायम पुढे वाटचाल केली आहे. या व्यतिरिक्त, यंदाच्या अर्थसंकल्पात कृषीक्षेत्रासाठी खालील तरतुदी प्रस्तावित आहेत.

कृषी कर्जाची उपलब्धता अधिक सुलभ करण्यासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत पतपुरवठ्यात 10 टक्क्यांची वाढ करुन तो 16.5 लाख कोटी करण्यात आला आहे. सूक्ष्म सिंचनाच्या तरतुदीत दुपटीने वाढ करत, ही तरतूद आता 10 हजार कोटी इतकी करण्यात आली आहे. तसेच एक हजार बाजार समित्यांना राष्ट्रीय ई- बाजारपेठेशी जोडण्याची तरतूद करण्यात आली आहे.
त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात, गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यासर्वांचा विचार करण्यात आला आहे. 

त्या म्हणाले की, मोदी सरकारच्या २०२१ -२२ च्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन, संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया देखील समाविष्ट करण्यात आला आहे. हा सर्वांचा आणि सर्वांसाठीचा अर्थसंकल्प आहे.

त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. भारतालाही त्याचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ करण्यासातही, नवे कर लावणे स्वाभाविक होते. मात्र, या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही. महागाई दर देखील 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे, मेट्रो, मालवाहतूक मार्गिका, बंदरे, विमानतळ अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मात्र 7.54 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष गिरीष पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, सरचिटणीस पवन भगुरकर, रोहिणी नायडू, डॉ.उमेश काळे आदी उपस्थित होते.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख