रुग्णांनो, खर्चाची चिंता सोडा, बरे होण्याची काळजी करा... - Pune Coroporation Will Bear Expenses of Corona Treatment of Needy People | Politics Marathi News - Sarkarnama

रुग्णांनो, खर्चाची चिंता सोडा, बरे होण्याची काळजी करा...

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 19 मे 2020

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलसह अन्य रुग्णालयांत रुग्ण सामावून घेण्याची क्षमता संपली. तेव्हा लगेचच महापालिकेने खासगी रुग्णालयांशी सामंजस्य करार करीत, तेथील बेड राखून ठेवले. अगदी अतिदक्षता विभागातील खाटाही रुग्णांसाठी उपलब्ध होतील, याची व्यवस्था केली.

पुणे : कोरोना झालाय ? उपचारासाठी सरकारी हॉस्पिटल म्हटलं की पोटात गोळा येतोय? मग, खासगी हॉस्पिटलमध्ये जायचयं ? पण, तिथल्या खर्चाची चिंता वाटतेय ना? तुम्ही आता कुठच्याच हॉस्पिटलमधल्या उपचार खर्चाची धास्ती घेऊ नका...कारण? गरजू कोरोना रुग्णांवरील उपाचाराचा सारा खर्च महापालिका करेल. खास तुमच्यासाठी महापालिकेनं तब्बल दहा कोटी रुपये राखून ठेवलेत. 

.....आणि हो, तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये तेही चांगले आणि वेळेत उपचार मिळावेत म्हणून खासगी हॉस्पिटलशी करारही केलाय. ज्यामुळे तुम्हाला उपचारासाठी कुठे नकार मिळणार नाही. तेव्हा, रुग्णांनो तुम्ही बरे व्हा ! कुठच्याही खर्चाचा घोर ठेवू नका....महापालिकेच्या आधी राज्य सरकारच्या महात्मा फुले योजना आणि धर्मादाय आयुक्तालयाकडुनही तुम्हाला मदत मिळणार आहे.

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलसह अन्य रुग्णालयांत रुग्ण सामावून घेण्याची क्षमता संपली. तेव्हा लगेचच महापालिकेने खासगी रुग्णालयांशी सामंजस्य करार करीत, तेथील बेड राखून ठेवले. अगदी अतिदक्षता विभागातील खाटाही रुग्णांसाठी उपलब्ध होतील, याची व्यवस्था केली. त्यासाठी आजघडीला विविध १३ रुग्णालयाशी करार करण्यात आला. मात्र, तेव्हा, प्रश्न उभा ठाकला तो, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च कोणी करायचा? 

गरजूंचा उपचाराचा खर्च उचलणार

त्यावर राज्य सरकारने कार्यवाही महात्मा फुले योजना काढली, खासगी रुग्णालयांत दाखल झालेल्या गरजूंचा सारा खर्च करण्याची सोय आहे. त्यापलीकडे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मदत देण्याची तयारी दाखवली. यात मात्र, पुणे महापालिकाही मागे राहिलेली नाही. महापालिका हद्दीतील रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल झाल्यास त्याला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी खासगी हॉस्पिटलचे नवी यंत्रणा उभी केली. तेथील रुग्णांच्या खर्च पुढच्या तीन महिन्यांत देणार असल्याचे लेखी देत रुग्णांना प्राधान्य देण्याची सूचना केली. 

दहा कोटी रुपये राखीव

या रुग्णांवरील उपचार कमतरता भासणार नाही म्हणून आपल्याकडचे दहा कोटी रुपये राखून ठेवले. ते कमी पडल्यास आणखी तरतूद करण्यात येईल, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

अग्रवाल म्हणाल्या, "खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा खर्च महापालिका, राज्य सरकार करेल. मात्र, या योजनांमधून गरजूंना लाभ मिळेल. परंत, या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट खोली घेतलेल्या आणि जे खरोखरी खर्च करू शकतात, अशा रुग्णांच्या कुटुंबियांनी स्वत: बिल द्यायचे आहे. परंतु, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना सर्व मदत केली जाईल. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांनी खर्चाची चिंचा करण्यापेक्षा बरे होण्यासाठी काळजी घ्यावी,''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख