केरळच्या हत्तीचे मिटेना, त्यात आमदार सरोज अहिरे म्हणतात 'बिबट्याला मारा'

केरळमध्ये हत्तीच्या हत्येचे प्रकरण ताजे आहे. त्यावरुन देशभर सोशल मिडीया तसेच अन्यत्र निर्माण झालेला राजकीय गदारोळ थांबण्याची चिन्हे नाहीत. अशातच येथील आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांवर हल्ला करणाऱ्याबिबट्याला ठार मारा, अशी मागणी करुन खळबळ उडवून दिली आहे.
केरळच्या हत्तीचे मिटेना, त्यात आमदार सरोज अहिरे म्हणतात 'बिबट्याला मारा'

नाशिक : केरळमध्ये हत्तीच्या हत्येचे प्रकरण ताजे आहे. त्यावरुन देशभर सोशल मिडीया तसेच अन्यत्र निर्माण झालेला राजकीय गदारोळ थांबण्याची चिन्हे नाहीत. अशातच येथील आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या मतदारसंघातील नरभक्षक बिबट्याला ठार मारा, अशी मागणी करुन खळबळ उडवून दिली आहे. विविध नद्या व ऊसाची पिके यामुळे नाशिकच्या परिसरात रोज विविध भागात बिबट्याचे अवचित दर्शन होतेच. यातील नक्की कोणता बिबट्या मारावा, असा प्रश्‍न वनविभागाला पडण्याची शक्‍यता आहे. 

नाशिक जिल्ह्यात विशेषतः नाशिक लगतच्या नद्यांच्या परिसरात नाशिक, देवळाली, निफाड, सिन्नर, इगतपुरी या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार आहे. बिबट्यांचे प्रजनन अन्य मार्जारवर्गीय प्राण्यांच्या तुलनेत अधिक आहे. ते परिस्थितीशी जुळवून घेतात. त्यामुळे त्यांना मुबलक प्रमाणात  लप ण्याची जागा उपलब्ध होते. त्यातून सह्याद्रीच्या परिसरातील हा भाग व जिल्ह्यात चारशेहून अधिक बिबटे असल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. रोजच त्याबाबत तक्रारी येतात. वन विभागाने पिंजरा लावल्यावर पडकलेला बिबट्या अन्य भागातील दाट जंगलाच्या भागात सोडला जातो. मात्र, अंधार होताच नागरीकांना सावधगिरी बाळगावी लागते. निफाडच्या गोदाकाठला तर शेतकऱ्यांना बिबट्याची सवय झाली आहे.

यावर पर्याय व उपाय शोधण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींना पर्याय सुचवून राज्य सरकारला धोरण ठरविण्या भाग पाडला पाहिजे. तसे झालेले नाही. अशातच बिबट्याला ठार करा या मागणींने गोंधळ उडण्याची शक्‍यताच अधिक आहे. माणसांवर हल्ले झालेली गावे भिन्न आहेत. त्यात नेमका बिबट्या शोधायचा कसा? या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते हा उत्सुकतेचा विषय आहे.

जागरुकता दाखविण्याची गरज

असे हल्ले झाल्यास संकटग्रस्तांना भरपाई व मदतीची गरज असते. वन विभागाकडून त्यात विलंब होतो. यापूर्वी निफाडला असा प्रकार घडला असता विधान परिषदेच्या सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी त्यात लक्ष घालून तातडीने भरपाई मिळवून दिली होती. अशी जागरुकता दाखविण्याची गरज आहे. 

या संदर्भात आमदार सरोज अहिरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना पत्र लिहिले आहे. त्याची प्रत सर्व प्रसारमाध्यमांनाही पाठवली आहे. ''देवळाली मदारसंघातील नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पाप लहान मुले व नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग व शेती व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकरी रात्री, पहाटे शेतात राबत असतात. मागील दोन महिन्यात हिंगणवेढे येथील कृणाल पगारे, दोनवाडे येथील रुद्र राजू शिरोळे ही लहान मुले तसेच नुकतेच जीवराम ठुबे या ज्येष्ठ नागरीकावर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते ठार झाले. शेवगे दारणा येथील समृद्धी कासार या चार वर्षाच्या मुलीवर देखील हल्ला झाला होता. मात्र तिच्या आजीने प्रसंगावधान राखल्याने ती वाचली. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरीक भयभीत आहेत. वन विभागाने या बिबट्याला त्वरीत जेरबंद करावे, अथवा त्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत,''  असे अहिरे यांनी या पत्रात म्हटले आहे. 

या पत्रामुळे वनमंत्री असे आदेश देणार का? याची उत्सुकता आहे. कारण असे झाल्यास असंख्य लोकप्रतिनिधी बिबट्यांबाबत हा 'सोपा' उपाय सुचवू शकतात.

बिबट्याला ठार करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व निकष निश्चित आहेत. त्याबाबत राज्याचे वरीष्ठ अधिकारी ठरवतात. त्याबाबत आम्ही काहीही प्रतिक्रीया देऊ शकत नाही. - शिवाजी फुले, जिल्हा वन संरक्षक, नाशिक. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com