ऑनलाईन नको, ऑफलाईन सभा घ्या; सांगलीच्या नगरसेविकेची मागणी - Sangli Women Corporator Demands Offline General Body | Politics Marathi News - Sarkarnama

ऑनलाईन नको, ऑफलाईन सभा घ्या; सांगलीच्या नगरसेविकेची मागणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा ऑनलाईन पद्धतीने न घेता सामाजिक अंतराचा अवलंब करून सभागृहात घेण्याची मागणी कॉंग्रेसच्या नगरसेविका कांचन कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे केली आहे

सांगली  : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा ऑनलाईन पद्धतीने न घेता सामाजिक अंतराचा अवलंब करून सभागृहात घेण्याची मागणी कॉंग्रेसच्या नगरसेविका कांचन कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे केली आहे. याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करण्याची सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोणत्याही सभा सभागृहात न घेता ऑनलाईन घेण्याची सूचना केली होती. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने संसदीय कामकाज तसेच विधिमंडळाचे कामकाज योग्य ते दक्षता घेऊन सभागृहात होत आहे. त्यानुसार महापालिकेचीही महासभा, स्थायी समिती सभा तसेच अन्य सभांचे कामकाज सभागृहात होणे आवश्‍यक असल्याचे निवेदन नगरसेविका कांचन कांबळे यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाइन सभेमुळे सदस्यांना त्यांचे विचार मांडण्यात अडचणी येत आहेत. तसेच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करताना तांत्रिक अडथळे येतात की जाणीवपूर्वक निर्माण केले जातात हे कळत नाही. शिवाय महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा न होता ते घाईगडबड मंजूर केले जात आहेत. महापालिकेचे सभागृह मोठे असल्याने तेथे कोरोनाचे सर्व नियम पाळून दक्षता घेऊन कामकाज करण्यासारखे आहे मात्र प्रशासनाकडून शासनाच्या अवर सचिव यांचे पत्र दाखवून सभागृहात सभा घेण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे कोणाच्या नियमांचे काटेकोर पालन करून सामाजिक आंतर ठेवण्याची दक्षता घेत सभागृहात कामकाज घेण्याबाबत महापालिका प्रशासनास आदेश करावेत अशी मागणी नगरसेविका कांबळे यांनी निवेदनात केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख