राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षपदासाठी आठ जणींमध्ये स्पर्धा - Eight women aspirants for the post of Solapur District NCP Women President | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षपदासाठी आठ जणींमध्ये स्पर्धा

प्रमोद बोडके
शनिवार, 10 जुलै 2021

त्यानंतर नव्या महिला जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर केले जाणार आहे. 

सोलापूर : अनिता नागणे यांनी राजीनामा दिल्याने सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे. या रिक्त पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुक व पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी एकूण 11 महिलांनी अर्ज केले होते. तीन महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे, तर आठ महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या आठ महिलांच्या मुलाखती आता घेतल्या जाणार आहेत. (Eight women aspirants for the post of Solapur District NCP Women President)
 
इच्छुक महिलांच्या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या शनिवारी (ता. 17) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात इच्छुक महिलांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. शनिवारी सकाळी सोलापूर शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक व दुपारी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या महिलांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांच्यासोबत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पश्‍चिम महाराष्ट्र निरीक्षक भारती शेवाळे, जिल्हा निरीक्षक दीपाली पांढरे उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : मुंडे समर्थक आक्रमक : ZP, पंचायत समिती सदस्यांसह १४ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
 
इच्छुक असलेल्या व पात्र ठरलेल्या आठ महिलांमध्ये पंढरपुरातील रंजना हजारे, साधना राऊत, सुवर्णा बागल, बार्शीतील ऍड. सुप्रिया गुंड-पाटील, शलाका मरोड पाटील, सुवर्णा शिवपुरे, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील उज्ज्वला पाटील व सोलापूर शहरातील जयश्री पवार यांचा समावेश आहे. इच्छुक महिलांच्या मुलाखती घेऊन प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर याबाबतचा अहवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतर नव्या महिला जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर केले जाणार आहे. 

इतरांनी नाराज न होता पक्षासाठी असेच योगदान द्यावे 

महिला जिल्हाध्यक्षाचे पद हे एकच आहे. या पदासाठी आठ जणी पात्र व इच्छुक आहेत. पद एकाच महिलेला मिळणार असल्याने उर्वरित महिलांनी नाराज होऊ नये. सर्व महिलांचे काम चांगले आहे. संधी न मिळालेल्या महिलांनी नाराज न होता पक्षासाठी आपले योगदान असेच कायम ठेवावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निरीक्षक दीपाली पांढरे यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख