८४ वर्षांपूर्वीच्या पहिल्या सरपंचांच्या नातसून झाल्या सरपंच

वातील सर्व जुने-जानते व नव्या पिढीचेही गावकारभारी एकत्र आले आणि त्यांनी गावातील दोन मोठ्या भावकी असलेल्या साकोरे व थिटेंना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपसरपंचपदी भरत ज्ञानेश्वर साकोरे यांची वर्णी लागली तर सरपंचपदी केंदूरचे पहिले सरपंच राहिलेले स्व.बाबुराव श्रीपती थिटे यांच्या नातसुन सौ.सुवर्णा सतीश थिटे-पाटील यांची एकमुखाने निवड केली
Suvarna Thite - Baburao Thite
Suvarna Thite - Baburao Thite

शिक्रापूर : देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांचे जिवलग मित्र माजी खासदार स्व. बापूसाहेब थिटे यांचे गाव असलेल्या केंदूर (ता.शिरूर) ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच होते त्यांच्याच भावकीतील स्व.बाबुराव श्रीपती थिटे-पाटील.

सन १९३६ च्या त्या काळात शेतसा-यावर मतदानाची पध्दत होती. पाच वर्षांच्या त्यांच्या कार्यकालाची चर्चा आजही गावात पुन्हा झाली ती याच कारणाने की, त्यांच्या नातसून सुवर्णा सतीश थिटे-पाटील या बिनविरोध गावच्या सरपंच झाल्या. तब्बल ८४ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा त्याच कुटुंबाला अशी संधी मिळणे तसेही दुर्मिळच, मात्र सुवर्णा थिटे-पाटील या याबाबतीत भाग्यवान ठरल्या.

देशाचे नेते शरद पवार यांच्या खास मर्जीतील नेते म्हणजे स्व.बापूसाहेब थिटे. शिरुर पंचायत समितीच्या सभापतीपदापासून ते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, युवक कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष, आमदार, गृहराज्यमंत्री आणि खासदार अशी सर्व संधी केवळ जिवलग मैत्रीपोटी पवार यांनी बापूसाहेबांना दिल्याचा इतिहास केंदूरकर आजही विसरलेले नाहीत. याच थिटे भावकीतील एक गावातील बडे प्रस्थ म्हणून सन १९३६ मध्ये केंदूरच्या ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच म्हणून विराजमान झाले होते ते स्व.बाबुराव श्रीपती थिटे-पाटील. बैलगाड्याचे प्रचंड शौकीन, गावातील प्रत्येक कारभारात, यात्रा-समारंभामध्ये आणि गावातील अठरा पगड जातींचे तंटे मिट्विण्याची जागा म्हणून थिटे पाटलांचा बंगला आजही कौतुकाचा विषय आहे. सन १९९४ मध्ये बाबुराव थिटे-पाटील निवर्तले. मात्र त्यांच्या घरात त्यांचे चिरंजीव शिवाजीराव थिटे एकदा सदस्य झाले. मात्र, पुन्हा या कुटुंबाला सरपंचपदाची संधी मिळाली नव्हती.

या काळात बळवंत मारुती साकोरे यांना दहा वर्षे, नारायणराव शिर्के, अर्जुनराव शेटे, बबन आप्पा थिटे, सदाशिवराव थिटे, बाबुराव साकोरे अशा अनेक जुन्या गावकारभा-यांना गावाने सरपंचपदाची संधी दिली. मात्र पुढील काळात सरपंचपदाच्या आरक्षणाने गावातील इतर अनेक कुटुंबांनाही सरपंचपदाची संधी मिळाली. यावर्षीची निवडणूक तशी वेगळी झाली. निकालही अनपेक्षित लागले. निकालानंतर सर्व  १७ सदस्य एकत्र आले आणि गावच्या हितासाठी सरपंच-उपसरपंचपदासाठीची निवडणूक करायची नाही असे ठरले. 

त्यानुसार गावातील सर्व जुने-जानते व नव्या पिढीचेही गावकारभारी एकत्र आले आणि त्यांनी गावातील दोन मोठ्या भावकी असलेल्या साकोरे व थिटेंना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपसरपंचपदी भरत ज्ञानेश्वर साकोरे यांची वर्णी लागली तर सरपंचपदी केंदूरचे पहिले सरपंच राहिलेले स्व.बाबुराव श्रीपती थिटे यांच्या नातसुन सौ.सुवर्णा सतीश थिटे-पाटील यांची एकमुखाने निवड केली. पर्यायाने तब्बल ८४ वर्षांनी या कुटुंबाला सरपंचपदाची संधी मिळाली आणि गावातील कुणालाही न्याय देणा-या बंगल्यावरच्या मालकांच्या गृहलक्ष्मीच्या हातात गावाने पुन्हा एकदा गावकारभाराची आणि सत्तेची सूत्रे दिली.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com