ट्रीपल तलाकशी लढणाऱ्या सायरा बानो भाजपमध्ये - Triple Talaq Crusader Sayra Bano Enters BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ट्रीपल तलाकशी लढणाऱ्या सायरा बानो भाजपमध्ये

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

स्लिम धर्मात असलेल्या ट्रीपल तलाक पद्धतीविरुद्ध नेटाने न्यायालयीन लढा देणाऱ्या सायरा बानो यांनी उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष बन्सीधर भगत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला

डेहराडून : मुस्लिम धर्मात असलेल्या ट्रीपल तलाक पद्धतीविरुद्ध नेटाने न्यायालयीन लढा देणाऱ्या सायरा बानो यांनी उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष बन्सीधर भगत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने ट्रीपल तलाकच्या मुद्द्यावर घेतलेल्या ठाम भूमीकेमुळे सायरा बानो यांनी या पक्षात प्रवेश केला आहे. 

सायरा बानो यांचा विवाह २००२ साली अलाहाबाद येथील एका प्रॉपर्टी डिलरबरोबर झाला होता.  सायरा यांना पतीकडून दररोज मारहाण होत होती. पतीकडून त्यांचा सातत्याने छळ केला जात होता. किरकोळ गोष्टींवरुन त्यांचा पती सायरा बानो यांचा छळ करत असे. अशातच एके दिवश पतीने सायरा बानो यांना  तलाकनामा पाठविला. त्यांनी याबाबत मुफ्तीकडे दाद मागितली.  तारेने पाठविलेला तलाकनामा वैध असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सायरा यांनी ट्रीपल तलाकला सर्वोच्च न्यायालयातआव्हान दिले.

तीन तलाकला गुन्हा मानावा अशी मागणी करत सायरा बानो यांनी सर्वात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उत्तराखंड राज्यातील काशीपूर येथील रहिवासी असलेल्या सायरा बानो यांनी तीन तलाक, बहुविवाह आणि निकाह हलाला यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. २०१६ मध्ये त्यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देत ट्रीपल तलाक घटनाबाह्य असल्याचे सांगितले. २०१९ मध्ये ट्रीपल तलाकचा मुद्दा संसदेत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ट्रीपल तलाकच्या विरोधात कायदा करुन असा तलाक अजामीनपात्र गुन्हा ठरवला. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख